दैवाची अनोखी लीला : चौसाळा येथील भूत वृद्धाश्रमात दोन चिमुकल्यांना कायमस्वरूपी आश्रय..
24 प्राईम न्यूज 23 Jan 2026
मनुष्याचे नशीब केव्हा, कुणाला कुठे नेईल आणि आयुष्यात केव्हा काय घडेल, हे कुणालाच माहीत नसते. अशाच संवेदनशील आणि अंतःकरण हेलावून टाकणाऱ्या घटनेचे जिवंत उदाहरण चौसाळा येथील स्व. श्री सत्यनारायण

अमोलकचंदजी भूत वृद्धाश्रम येथे पाहायला मिळाले.
जवळपास आठ ते दहा दिवसांपूर्वी एनजीओ यवतमाळ ग्रुपवर निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्ष सौ. चेतनाताई राऊत यांनी जीएमसी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या एका एचआयव्हीग्रस्त विधवा मातेसंदर्भात पोस्ट टाकली होती. या मातेसोबत तिची तीन मुले असून, तपासणीत ती माता आणि तिचा दीड वर्षांचा मुलगा एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तिच्या दोन मुली —
१) कोमल गिरी (वय १० वर्षे)
२) प्रतिक्षा गिरी (वय ४ वर्षे)
या दोन्ही मुली एचआयव्हीग्रस्त नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले.
या आईसह तिच्या तिन्ही मुलांची संपूर्ण जबाबदारी सौ. चेतनाताई राऊत यांनी स्वीकारली आहे. ही माहिती वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री. हरीओम भूत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने आपले सुपरवायझर प्रणव यांना जीएमसी दवाखान्यात पाठवून संपूर्ण चौकशी केली. मातेच्या व मुलांच्या जेवणाची कोणतीही परिपूर्ण व्यवस्था नसल्याने वृद्धाश्रमाच्या वतीने दोन्ही वेळचे जेवणाचे डबे पाठवून भोजनाची सोय करण्यात आली.
यानंतर मातेच्या संमतीने व परवानगीने तिच्या दोन्ही मुलींना — कोमल व प्रतिक्षा — स्व. श्री सत्यनारायण अमोलकचंदजी भूत वृद्धाश्रम, चौसाळा येथे कायमस्वरूपी निवारा देण्यात आला. या दोन्ही मुलींची संपूर्ण देखरेख व संगोपनाची जबाबदारी सौ. चेतनाताई राऊत यांनी स्वतः स्वीकारली असून त्या नियमितपणे आश्रमात येऊन लक्ष ठेवणार आहेत.
वृद्धाश्रम सुरू करताना संस्थापक अध्यक्ष श्री. हरीओम भूत यांची मनापासून इच्छा होती की, उत्कृष्ट सोयींनी युक्त वृद्धाश्रमासोबत एक सुसंस्कारित अनाथालयही सुरू व्हावे. ईश्वरी कार्याचा प्रामाणिक संकल्प केल्यास ईश्वर स्वतः मार्ग दाखवतो, याचीच प्रचिती या घटनेतून येते. या दोन लक्ष्मीस्वरूप मुलींमुळे आश्रमाच्या अनाथालय प्रकल्पाची पवित्र सुरुवात झाली आहे.
आश्रमातील सुसज्ज व्यवस्था पाहून त्या मातेच्या मनात पूर्ण समाधान आणि विश्वास निर्माण झाला. बोलताना तिचे अश्रू अनावर झाले. भविष्यात आपल्या दोन्ही मुलींचे संगोपन, शिक्षण व उज्ज्वल भविष्य सुरक्षित हातात असल्याची तिला पूर्ण खात्री मिळाली आहे. तिच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान व विश्वास हेच या आश्रमाच्या ईश्वरीय कार्याचे खरे फळ असून, सर्वांच्या सहकार्याने हे पुण्यकार्य यशस्वी होत असल्याचे चित्र आहे.
