राष्ट्रीय वयोश्री योजना वृद्धांना जगण्याचा आधार. खा. स्मिता वाघ. अमळनेर तालुक्यातील १२३५ ज्येष्ठ नागरिकांना १ कोटी २० लाखांचे जीवनोपयोगी साहित्य वाटप..
अमळनेर/ आबिद शेख
राष्ट्रीय वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणारे जीवनोपयोगी साहित्य हे त्यांच्या जगण्याचा खरा आधार आहे. वृद्ध माता-पित्यांच्या चेहऱ्यावर आज उमटलेला आनंद हेच माझ्या कार्याचे खरे सार्थक असल्याचे प्रतिपादन खासदार स्मिता वाघ यांनी केले.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारता मंत्रालय व एलिमको (ALIMCO) कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत अमळनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या योजनेअंतर्गत अमळनेर तालुक्यातील १२३५ ज्येष्ठ नागरिकांना सुमारे १ कोटी २० लाख रुपये किमतीचे १५ प्रकारचे जीवनोपयोगी साहित्य मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये कृत्रिम दात, कर्णयंत्र, कृत्रिम पाय, काठी, व्हील चेअर, कमोड चेअर, चष्मे, कंबर व गुडघ्याचे पट्टे आदी साहित्याचा समावेश आहे.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल अग्रवाल, माजी जि.प. सदस्य जयश्री पाटील, डॉ. अनिल शिंदे, युवा नेत्या भैरवी पलांडे, भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, योगेश महाजन, ॲड. व्ही. आर. पाटील, संदीप पाटील, हिरालाल पाटील, माजी पंचायत समिती सभापती श्याम अहिरे, रेखा पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील, बीडीओ एन. आर. पाटील, नगरसेविका स्वप्ना पाटील, विजय राजपूत, विक्रांत पाटील, श्याम पाटील, भरतसिंग परदेशी, तुळशीराम हटकर, एल. टी. पाटील, मछिंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. स्मिता वाघ पुढे म्हणाल्या की, वृद्धांनाही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हावेसे वाटते, गप्पा ऐकायला, विविध पदार्थ खायला आवडतात. त्यांनाही भावना असतात. मात्र वाढत्या वयामुळे दात, कान, हात-पाय कमजोर होतात. ते कृत्रिम साधनांच्या माध्यमातून सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या की, राज्यात राष्ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी सुरुवात जळगाव जिल्ह्यातून होत असून खासदार स्मिता वाघ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अमळनेर तालुक्यातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळाला आहे.
माजी जि.प. सदस्य जयश्री पाटील यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना, ज्येष्ठ नागरिकांना आनंद देणारा हा प्रकल्प असून युती शासनाचा हा स्तुत्य उपक्रम आहे, असे मत व्यक्त केले.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख एस. पी. गणेशकर यांनी सांगितले की, ६० वर्षांवरील पात्र नागरिकांना चालण्यासाठी व्हील चेअर, काठी, शौचासाठी कमोड चेअर, ऐकण्यासाठी कर्णयंत्र, खाण्यासाठी कृत्रिम दात, पाहण्यासाठी चष्मे, तसेच पाय, गुडघे व कंबर पट्टे अशा एकूण १५ प्रकारचे साहित्य दिले जात आहे.
कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात रामेश्वर येथील सुशीलाबाई पाटील, मथुराबाई पाटील, अल्काबाई पाटील, दरेंगावच्या कमलाबाई चव्हाण, कल्पनाबाई जोशी, लोण येथील हरिश्चंद्र पाटील, भीमराव पाटील, बन्सीलाल पाटील, युवराज पाटील व विश्वनाथ पाटील यांना साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एलिमको कंपनीचे किरण पावरा, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे मुकुंद गोसावी, राकेश पाटील, राहुल चौधरी, समाधान पाटील, अमोल पाटील, प्रवीण पाटील यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले.
