अमळनेर येथे अल-खिदमत ट्रस्टच्या मोफत ओपीडी केंद्राचा शुभारंभ; 32 गरजू रुग्णांना तपासणी व औषधांचा लाभ..

0
New-Doc-01-19-2026-07.43.jpg


अमळनेर /आबिद शेख
गोरगरीब व गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार उपलब्ध व्हावेत, या उदात्त सामाजिक हेतूने अमळनेर येथील अल-खिदमत ट्रस्टच्या वतीने मोफत ओपीडी (बाह्यरुग्ण तपासणी) केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी आयोजित पहिल्याच वैद्यकीय शिबिरात 32 गरजू रुग्णांनी तपासणी व मोफत औषधांचा लाभ घेतला.


अमळनेर शहरातील सुमारे 100 समाजसेवक एकत्र येऊन अल-खिदमत ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत आहेत. मुंबई येथील हॉप्स इंडिया तसेच मालेगाव येथील हजरत अमीना ट्रस्ट यांच्या सहकार्याने गरीब व गरजू रुग्णांसाठी आवश्यक मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, थायरॉईड, किडनी विकार, डायलिसिस, दमा व अस्थमा यांसारख्या दीर्घकालीन आजारांवरील औषधे महाग असल्याने अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टने दर महिन्याला मोफत तपासणी व औषधोपचार देण्याचा संकल्प केला आहे.
इस्लामपुरा परिसरातील एका कार्यालयात हे मोफत ओपीडी केंद्र सुरू करण्यात आले असून सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस रुग्ण तपासणी केली जाणार आहे. पुरुष रुग्णांसाठी डॉ. फिरोज शेख, तर महिला रुग्णांसाठी आठवड्यातून एक दिवस डॉ. शारामीन समद बागवान मोफत वैद्यकीय सेवा देत आहेत. पहिल्याच दिवशी 32 रुग्णांनी नोंदणी करून तपासणी व औषधांचा लाभ घेतला. या शिबिरात हिंदू व मुस्लिम रुग्णांचा सहभाग असल्याने सामाजिक व जातीय सलोख्याचे सुंदर चित्र दिसून आले.
मोफत ओपीडी केंद्राच्या उद्घाटन समारंभास हॉप्स इंडियाचे हाजी रेहान धोराजीवाला, हजरत अमीना ट्रस्टचे डॉ. हमीद इकबाल, तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्यासह नगरसेवक व नगरसेविकांची उपस्थिती होती. मान्यवरांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत अशा सेवाभावी कार्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
अल-खिदमत ट्रस्टच्या वतीने भविष्यात शिक्षण, अभ्यासिका, विविध धर्मादाय सामाजिक उपक्रम तसेच आपत्तीच्या काळात मदतकार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या ट्रस्ट दर महिन्याला 15 गरजू कुटुंबांना मोफत रेशन पुरवतो. तसेच अमळनेर शहरातील 100 सदस्य दरमहा आपल्या उत्पन्नातून समाजसेवेसाठी आर्थिक योगदान देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed