अमळनेरमध्ये सुसज्ज पार्कचा अभाव; मोबाईलमध्ये अडकले बालपण..

0
New-Doc-01-18-2026-22.23.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर हे मोठे शहर असतानाही शहरात सुसज्ज व आकर्षक सार्वजनिक पार्क नसल्याची तीव्र खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुलांसाठी खेळणी, घसरगुंडी, झोके, मोकळे मैदान, हिरवळ व सुरक्षित सुविधा असलेले पार्क नसल्यामुळे मुलांना मैदानी खेळांचा छंदच लागत नाही.


आजच्या घडीला शहरातील बहुतांश लहान मुले दिवसभर मोबाईलवर विविध गेम खेळण्यात गुंग असल्याचे चित्र दिसून येत आहे. मैदानी खेळ, व्यायाम व सामाजिक संवादाचा अभाव यामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून अनेक मुले अस्वस्थ, चिडचिडी व एकाकी होत असल्याचे पालक सांगत आहेत.
पूर्वीच्या काळात संध्याकाळ होताच मुले मैदानावर खेळण्यासाठी धाव घेत असत; मात्र आज अमळनेरसारख्या शहरात सुरक्षित व सुसज्ज खेळाची ठिकाणेच नसल्याने पालकांनाही मुलांना बाहेर पाठवताना अडचणी येत आहेत. परिणामी मोबाईल व टीव्ही हेच मुलांचे मुख्य मनोरंजनाचे साधन बनले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून लोकप्रतिनिधी व नगरपालिकेने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शहरातील मोकळ्या जागांवर बालउद्यान, सुसज्ज पार्क, जॉगिंग ट्रॅक व हिरवळ विकसित केल्यास मुलांना खेळासाठी प्रोत्साहन मिळेल तसेच शहराच्या आरोग्यदृष्ट्या विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अमळनेर सारख्या मोठ्या शहरात किमान काही तरी आदर्श व सुसज्ज पार्क उभारले जावेत, हीच आज शहरवासीयांची मागणी बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed