राज्यात AIMIMचा राजकीय उदय; १३ महापालिकांत ९५हून अधिक नगरसेवक विजयी..
24 प्राईम न्यूज 17 jan 2026
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निकालांत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने जोरदार मुसंडी मारत राज्याच्या राजकारणात आपली ताकद स्पष्टपणे

दाखवून दिली आहे. राज्यातील २९ पैकी तब्बल १३ महापालिकांमध्ये AIMIMचे ९५हून अधिक नगरसेवक विजयी झाले असून, अनेक ठिकाणी पारंपरिक पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई महानगरपालिकेत AIMIMने ४ जागांवर विजय मिळवला आहे. मानखुर्द–गोवंडी परिसरात AIMIMने समाजवादी पक्षा ला मोठा धक्का देत आपली पकड मजबूत केली आहे. मुंबईतील मुस्लीमबहुल भागांमध्ये AIMIM अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा प्रभाव दिसून आल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राज्यातील सोलापूर, धुळे आणि नांदेड या महापालिकांमध्ये प्रत्येकी ८ नगरसेवक AIMIMचे निवडून आले असून, या तिन्ही शहरांत एकूण २४ जागांवर पक्षाने यश मिळवले आहे. अमरावती महापालिकेत ६, ठाणे महापालिकेत ५ तर नागपूर महापालिकेत ४ नगरसेवक AIMIMचे विजयी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत AIMIMचा सर्वाधिक दबदबा पाहायला मिळाला असून येथे तब्बल २४ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच मालेगाव महापालिकेतही AIMIMने २० जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
मुंबईत AIMIMच्या विजयाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, या निकालांमुळे राज्याच्या अल्पसंख्याक राजकारणात मोठा बदल घडत असल्याचे स्पष्ट होत आहे. समाजवादी पक्षाला मागे टाकत AIMIMने अनेक भागांत आपली सरशी सिद्ध केली असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.
