अल्पवयीन मुकबधिर मुलीवर अत्याचार; आरोपीस 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा..
अमळनेर | आबिद शेख
अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुकबधिर मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दिपक नाना भिल (वय 27, रा. ढेकू बु., ता. अमळनेर, जि. जळगाव) यास न्यायालयाने 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी 7 हजार रुपये पीडितेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणी अमळनेर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 45/2022 अन्वये स्पेशल पोक्सो केस नं. 09/2022 दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 376 (2)(एन) तसेच पोक्सो अॅक्ट कलम 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारीनुसार, आरोपीने त्याच गावातील 16 वर्षीय मुकबधिर अल्पवयीन मुलीस रात्रीच्या वेळी तिच्या घरासमोर खाटेवर झोपलेली असताना आपल्या घराच्या मागील बाजूस नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच शेतात कामासाठी गेलेली असताना देखील आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या सततच्या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली.
पीडित मुलीच्या वडिलांनी 30 जानेवारी 2022 रोजी अमळनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
या खटल्याचे कामकाज मा. तदर्थ अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश श्री. एल. डी. गायकवाड यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल व मंगरूळकर यांनी एकूण 9 साक्षीदार तपासले. पीडित मुलगी मुकबधिर असल्याने तिची साक्ष विशेष शिक्षक-दुभाषिकाच्या मदतीने बंद दरवाज्यात व्हिडिओग्राफीद्वारे नोंदवण्यात आली.
पीडितेची आई, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील व डॉ. अनिता देशमुख यांच्या साक्षी, तसेच डीएनए अहवालाद्वारे गर्भातील बाळ आरोपीचेच असल्याचे सिद्ध झाले. पीडितेचे वय 16 वर्षे असल्याबाबतचे पुरावेही महत्त्वाचे ठरले.
सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी ठरवत भा.दं.वि. कलम 376 (2)(एन) व पोक्सो अॅक्ट कलम 6 अंतर्गत 20 वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी खटला सुरू असतानाच अटकेत असून तो कारागृहात होता.
या खटल्यात पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, पोलीस उपनिरीक्षक उदयसिंग साळुंके, पो.हे.कॉ. प्रमोद चोपडा (शहर पो.स्टे.), पो.कॉ. राहुल रणधीर चोपडा (ग्रामीण), पो.हे.कॉ. भरत ईशी (मारवड), तसेच पो.कॉ. सतीश भोई (अडावद) यांनी सहकार्य केले.
