“लावरे तो व्हिडिओ…” नंदुरबारमधील गुंडगिरीचा तीव्र निषेध; अमळनेरच्या संस्कृतीला डाग लागू देणार नाही – आमदारांचा ठाम इशारा…
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नंदुरबार येथे घडविलेली गुंडगिरीची घटना ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी असून, एका माजी लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचे हिंसक कृत्य घडणे अत्यंत संतापजनक आहे, अशा तीव्र शब्दांत माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी या घटनेचा निषेध केला. अमळनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडत अमळनेरकर जनतेला अशा घातक प्रवृत्तीपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

🎁 101 बक्षीसे वाट बघत आहे !
लकी कूपन योजने चे शेवटचे काही दिवस शिल्लक…!!
योजना कालावधी
25 जानेवारी 2026 पर्यंत
916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% *
आमदार पाटील म्हणाले की, नंदुरबारमध्ये घडलेल्या घटनेचे सर्व पुरावे सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाले असून, सत्य आता कुणापासून लपून राहिलेले नाही. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी “लाव रे तो व्हिडीओ” असे म्हणत मोठ्या डिजिटल स्क्रीनवर संबंधित व्हिडिओ पत्रकारांना दाखवले. त्या व्हिडिओंमधून ऍक्शनची सुरुवात चौधरी यांनीच केल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सत्तेची मस्ती आल्याने चौधरी बंधू व त्यांच्या पुत्रांनी विरोधी भाजपाच्या गटास जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न केला. हावभाव, चिथावणीखोर कृती यामुळे वातावरण तापवले गेले. एवढ्यावरच न थांबता, चौधरी बंधू, त्यांचे सुपुत्र व कार्यकर्त्यांची मोठी टोळी थेट विरोधी भाजपा कार्यकर्त्याच्या घरी गेली, घरात घुसून कपडे काढून अमानुष मारहाण केली, धमक्याही दिल्या. हे सर्व करताना माजी आमदार झुंडशाही पद्धतीने वागत असल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
“एवढ्या गंभीर घटनेनंतर ऍक्शनला रिऍक्शन होणे साहजिकच आहे. त्यामुळे त्याच रात्री संतप्त जमावाने त्यांच्या घरावर हल्ला केला, हे स्पष्ट आहे,” असे सांगत त्यांनी सुरुवातीला निरपराध असल्याचा आव आणण्यात आला, मात्र मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सारे सत्य उघड झाले, असेही नमूद केले.
लोकप्रतिनिधी असलेल्या कुटुंबाकडून अशा प्रकारची गुंडगिरी होणे हे नंदुरबारच नव्हे, तर संतांची भूमी असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः अमळनेरच्या संस्कृतीसाठी अत्यंत लाजिरवाणे आहे, असे आमदार पाटील म्हणाले. याचबरोबर “अशा परिस्थितीत पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी दिलीच कशी?” असा थेट सवाल त्यांनी नंदुरबार पोलीस प्रशासनाला केला.
अमळनेर मतदारसंघातील राजकीय संस्कृतीचा उल्लेख करताना आमदार पाटील म्हणाले की, आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी झाले, मात्र कुणाच्या घरावर हल्ले झाले किंवा कुणी लोकप्रतिनिधी स्वतः कुणाच्या घरी जाऊन हल्ला केल्याची उदाहरणे नाहीत. कारण ही अमळनेरची संस्कृतीच नाही. विकासकामांदरम्यान सोशल मीडियावर टीका झाली तरी आम्ही ती खिलाडू वृत्तीने स्वीकारली आहे. कुणालाही शिवीगाळ किंवा मारहाण केल्याचे एकही उदाहरण दाखवून द्यावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
याउलट, विरोधात एखाद्या कार्यकर्त्याने थोडीफार टीका केली तरी धमक्यांचे राजकारण केले जाते. ही दहशतीची राजकीय संस्कृती नंदुरबार व अमळनेरकर जनतेसाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांना स्पष्ट संदेश
नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांना उद्देशून आमदार पाटील म्हणाले की, जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्णतः मान्य करतो. विकासासाठी माझे सहकार्य राहील, मात्र अशा गुंड प्रवृत्तीला नेतृत्व देऊन अमळनेरचे नुकसान करू नका. तसे केल्यास हा जनतेशी विश्वासघात ठरेल आणि अमळनेरची भोळी जनता माफ करणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
पालिका निवडणुकीनंतर अमळनेरचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्या वेळी येथील महिला भगिनी व जनतेने जोरदार उत्तर दिले, याची आठवण त्यांनी करून दिली. वादाच्या दिवशी अमळनेरमधील काही मंडळी नंदुरबार येथे हजर होती, त्यांनी किमान आपल्या शहराला बदनामी होईल असे वागू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
“आपण सर्व जाती-धर्मीय गुण्यागोविंदाने नांदत आहोत. स्वार्थासाठी कुणी मिठाचा खडा टाकत असेल तर आताच सावध व्हा. माझा लढा केवळ अमळनेरची संस्कृती टिकवण्यासाठी आहे, यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी त्यांनी ठामपणे सांगितले की, ‘जैसी करणी वैसी भरणी’ होतेच. कायद्यासमोर कुणीही मोठे नाही. कोणत्याही पक्षात असलात तरी चुकीला माफी नाही. शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे देखील अशा प्रवृत्तीचे समर्थन करणार नाहीत. एट्रोसिटी, विनयभंग, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे चौधरी बंधू व इतरांवर दाखल असून, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
२०१६ च्या पालिका निवडणुकीत दहशतीचे अनुभव अमळनेरकरांनी घेतले असून, त्याची पुनरावृत्ती नको असेल तर आजच अशा प्रवृत्तीला दूर ठेवा, एकजूट ठेवा आणि कुणाच्या नादी लागू नका, असे कळकळीचे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी तमाम जनतेस केले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पोलीस महानिरीक्षकांची भेट घेणार
नंदुरबार येथील घटनेप्रकरणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पोलीस महानिरीक्षक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देत सखोल चौकशीची मागणी करणार असून, या प्रकरणी विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
