अमळनेर बस स्थानकात उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचा श्रमदानातून स्वच्छतेचा संदेश; एसटी कर्मचाऱ्यांशी साधला थेट संवाद.

अमळनेर /आबिद शेख
शहर स्वच्छतेचा आदर्श घालून देत अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी अमळनेर बस स्थानक परिसरात स्वतः उपस्थित राहून साफसफाई करत श्रमदान केले. लोकप्रतिनिधी केवळ सूचना न देता स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करत असल्याने नागरिकांमध्ये समाधान आणि सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.
बस स्थानक हा शहराचा महत्वाचा सार्वजनिक परिसर असून, रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. या ठिकाणी स्वच्छता राखली जावी, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या कृतीमुळे स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून, नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
उच्च शिक्षण घेतलेले, संवेदनशील व जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून प्रशांत निकम यांची ओळख आहे. साफसफाईनंतर त्यांनी बस स्थानकातील एसटी कर्मचारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या दैनंदिन अडचणी, समस्या आणि आवश्यक सोयी-सुविधांबाबत माहिती घेतली.
उपनगराध्यक्षांनी दाखवलेल्या आपुलकीच्या आणि समजूतदार भूमिकेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंद, उत्साह व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारे जनतेच्या प्रश्नांकडे थेट लक्ष देत असतील, तर शहराच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
