अमळनेरात राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त बहुजन समाजाची एकजूट; मान्यवरांकडून अभिवादन..

0
New-Doc-01-13-2026-11.27.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – स्वराज्य संकल्पनेच्या जननी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता व गुरू असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथे बहुजन समाजातील कार्यकर्ते व मान्यवरांनी एकत्र येत एकजुटीचे दर्शन घडवले. स्टेशन रोडवरील प्रबुद्ध विहार येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊंना मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डी. ए. पाटील सर यांनी जिजाऊ वंदना सादर केली.
या प्रसंगी प्रा. डॉ. राहुल निकम यांनी आपल्या भाषणात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, राष्ट्रमाता जिजाऊ या केवळ माताच नव्हे तर उत्तम राज्यकर्त्या, महान गुरू आणि शस्त्रविद्येत पारंगत स्त्री होत्या. अंधश्रद्धेपलीकडे जाऊन त्यांनी शिवरायांना स्वराज्याची व्यापक दृष्टी दिली. शेतकऱ्यांबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता व स्वराज्यातील शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची मदत केली जात असे. परिपूर्ण स्त्रीत्वाचे उदाहरण म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ आजही समाजासमोर आदर्श ठरतात. आजच्या काळात प्रत्येक स्त्री व पुरुषाने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या घरात ‘शिवाजी’ घडवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात नवनियुक्त उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचा तसेच दुसऱ्यांदा निवडून आलेल्या नगरसेविका सविता संदानशिव यांचा बहुजन समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी साहित्यरत्न प्रा. शिवाजी पाटील, समाजभूषण किरण बहारे, वरिष्ठ कार्यकर्ते नानासाहेब मनोहर पाटील, किसान मोर्चाचे अरुण देशमुख, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अशोक पवार, प्रा. भालेराव, ॲड. विजय ढिवरे, ॲड. अविनाश खैरनार, अतुल डोळस, हृदयनाथ मोरे, अर्जुन संदानशिव, धीरज ब्रह्म्हे, मनोज मोरे, राहुल बिर्हाडे, पत्रकार प्रा. डॉ. विजय गाढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांना अभिवादन करत बहुजन समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत समाजप्रबोधनाचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed