अमळनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रशांत निकम; चार स्वीकृत नगरसेवकांची घोषणा..

अमळनेर |आबिद शेख
अमळनेर येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसह चार स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशनाबाबत शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता होती. अखेर शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक प्रशांत निकम यांची अमळनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ही निवड आज शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी रोजी दुपारी सव्वा तीन वाजता नगरपरिषदेत आयोजित विशेष सभेत जाहीर करण्यात आली. या सभेचे पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर होते. त्यांनी उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची अधिकृत घोषणा केली.
महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील कलम ५१-अ (१-अ) उपकलम ९ नुसार नगराध्यक्ष व सदस्य निवडून आल्यानंतर राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्यापासून २५ दिवसांच्या आत उपनगराध्यक्षाची निवड करणे बंधनकारक आहे. तसेच कलम ५१-ब नुसार नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांच्या निवडीसाठी स्वतंत्र सभा घेणे आवश्यक असते. या कायदेशीर तरतुदीनुसार ही विशेष सभा घेण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्षपदी प्रशांत निकम (अपक्ष गट) यांची निवड करण्यात आली. तसेच नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी शिंदे सेना गटातून गुलाबराव पाटील, मोहन सातपुते, तालुका व शहर विकास आघाडीतून डॉ. डिगंबर महाले आणि अपक्ष गटातून प्रताप साळी यांची निवड जाहीर करण्यात आली.
या निवडीमुळे अमळनेर नगरपरिषदेच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून, शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
