अमळनेर नगरपरिषदेत आज रंगणार सत्ताकारण; उपनगराध्यक्ष कोण? स्वीकृत सदस्यांबाबतही उत्सुकता..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसह चार स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशनाबाबत शहरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यासंदर्भात पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी दि. ९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता नगरपरिषदेत विशेष सभा बोलावली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील कलम ५१-अ (१-अ) उपकलम ९ नुसार नगराध्यक्ष व सदस्य निवडून आल्यानंतर राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्यापासून २५ दिवसांच्या आत उपनगराध्यक्षाची निवड करणे आवश्यक आहे. तसेच कलम ५१-ब नुसार नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांच्या निवडीसाठी सभा घेणे बंधनकारक आहे. या सभेचे पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष कार्यभार पाहणार आहेत.
उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :
दि. ९ रोजी सकाळी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल व स्वीकारली जाणार आहेत. सभेत नामनिर्देशन पत्रांची १५ मिनिटांत छाननी केली जाईल. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर १५ मिनिटांची माघार घेण्याची मुदत देण्यात येणार असून, आवश्यक असल्यास निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल.
उपनगराध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर चार स्वीकृत सदस्यांची देखील निवड होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार यामध्ये शिंदे सेना गटाचे दोन, अपक्ष गटाचा एक आणि तालुका व शहर विकास आघाडीचा एक सदस्य नामनिर्देशित केला जाणार आहे. मात्र, नेमकी संधी कोणाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
उपनगराध्यक्षाची निवड झाल्यानंतर गट व आघाडीच्या सदस्यसंख्येनुसार स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. सुचवलेल्या सदस्यांची संख्या आवश्यक संख्येपेक्षा अधिक असल्यास, ज्यांची नावे आधी सूचित केली जातील त्यांना प्राधान्याने नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडले जाईल.
या निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अमळनेरकरांच्या नजरा उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत सदस्यांच्या नावांकडे लागल्या आहेत.
