निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या कामाची जनआंदोलन समितीकडून प्रत्यक्ष पाहणी; निधी, प्रगती व पुनर्वसनाबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती..

0
New-Doc-01-07-2026-23.09.jpg


अमळनेर /आबिद शेख
निम्न तापी प्रकल्पांतर्गत पाडळसरे धरणाच्या कामाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देण्यात आली. यावेळी शासनाकडून प्राप्त निधी, झालेला खर्च, बांधकामाची प्रगती तसेच पुनर्वसनाबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांनी घेतली.
पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्यानंतर महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या संदर्भात समिती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्याच अनुषंगाने बांधकामाची सद्यस्थिती, प्रगती व पुनर्वसनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जनआंदोलन समितीचे पदाधिकारी धरणावर उपस्थित राहिले.
यावेळी जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेंद्र बोरसे, महेश पाटील, देविदास देसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणाचे काम गतिमान व कालबद्ध पद्धतीने व्हावे, तसेच प्रशासनिक, तांत्रिक व आर्थिक अडचणी काय आहेत, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून माहिती घेतली.
याप्रसंगी झालेल्या बैठकीत निम्न तापी प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता य. म. कडलक यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, धरणाच्या बांधकामासोबतच इतर पूरक बाबी एकाच वेळी पूर्ण करणे आवश्यक असते. अन्यथा पाणी साठलेले दिसते, पण प्रत्यक्षात पाणी वापरासाठी मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाणी साठवणुकीपर्यंत नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध पातळ्यांवर समांतर कामे सुरू आहेत. भूसंपादन व पुनर्वसनासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या धरणाच्या कामात कोणतीही तांत्रिक अडचण नसल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, नदी सहा महिने वाहत असल्याने कामासाठी मर्यादित कालावधी उपलब्ध होतो. तरीही पूर्ण क्षमतेने बांधकाम सुरू आहे. पाडळसरे धरण हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे गेट असलेल्या धरणांपैकी एक असून, अत्यंत तांत्रिक व बारकाईने करावयाचे काम असल्याने वेळ लागतो. सध्या मनुष्यबळ कमी असले तरी लवकरच स्टाफ उपलब्ध होईल. सध्या एक कर्मचारी तीन जणांचे काम करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी उपअभियंता भटूरकर यांच्या उपस्थितीत शासनाकडून प्राप्त व खर्च झालेल्या निधीची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
यावेळी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी समितीची भूमिका सविस्तरपणे मांडली. बैठकीचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले, तर आभार सुनील पाटील यांनी मानले. यावेळी भरतसिंग परदेशी, एन. के. पाटील, ॲड. कुंदन साळुंखे, डॉ. संजय पवार, रहेमतुल्ला पिंजारी, सुशील भोईटे, प्रसाद चौधरी, सतीश काटे, डी. के. पाटील, प्रविण संदानशिव, पुरुषोत्तम शेटे, ज्ञानेश्वर वारुळे, दिनेश पाटील, गुलाब पाटील, मोहन तिलक, गौतम संदानशिव, रमेश चव्हाण, भगवान कोळी, माधव पाटील, सुपडू बैसाणे, नारायण बडगुजर, संजय सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकारात्मक भूमिकेसाठी शासनातर्फे आभार
यावेळी कार्यकारी अभियंता य. म. कडलक यांनी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या सकारात्मक भूमिकेचे विशेष कौतुक केले. अनेक ठिकाणी जनआंदोलने प्रकल्पांच्या विरोधात असतात; मात्र पाडळसरे धरण जनआंदोलन समिती ही धरणाच्या व प्रशासनाच्या समर्थनार्थ सदैव उभी राहिली आहे. ही अत्यंत दुर्मिळ व सकारात्मक बाब असल्याचे सांगत त्यांनी शासनाच्या वतीने समितीचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed