महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुरुषांच्या नजरा बदलण्याची गरज – ॲड. रंजना पवार-गवांदे..

अमळनेर | आबिद शेख
महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर केवळ कायदे नव्हे, तर पुरुषांच्या नजरा व मानसिकता सुधारण्यासाठी समाजाने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, डॉ. रखमाबाई, कमलाताई सोहनी यांसारख्या थोर महिलांचे कर्तृत्व मुलींसह समाजाला समजावून सांगणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन ॲड. रंजना पवार-गवांदे यांनी केले.
अमळनेर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि अमळनेर महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात २ ते ५ जानेवारी दरम्यान सावित्रीबाई फुले महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात “अंधश्रद्धा आणि ही महिला” या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
ॲड. पवार-गवांदे पुढे म्हणाल्या की, अंधश्रद्धा महिलेच्या जन्मापासूनच सुरू होते. मुलीचा जन्म अनेकदा अस्वागतार्ह मानला जातो. त्यामुळे मुलींचा जन्मदर घटतो आणि आजच्या पिढीतील तरुणांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत. यामागे मुलींची असुरक्षितता, लग्नातील अवाजवी खर्च ही प्रमुख कारणे आहेत. मुलींनी आपल्या पालकांकडे साध्या पद्धतीने लग्न करण्याचा आग्रह धरावा तसेच पालकांच्या जबाबदाऱ्या उचलण्याची तयारी ठेवावी. मुलगा-मुलगी समानता समाजाने प्रत्यक्षात स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
समाजातील व्रत, वैकल्य, उपवास हीदेखील अंधश्रद्धेचीच रूपे असून महिलांनी सक्षम होण्यासाठी उपवास नव्हे तर सकस आहार घेणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. सावित्रीबाई फुले यांनी समाजाविरुद्ध विद्रोह करून महिलांना आत्मविश्वास व जगण्याचे बळ दिले. पंडिता रमाबाईंनी संस्कृत शिक्षण घेतल्यामुळे समाजाने बहिष्कार टाकला तरीही त्यांनी बंडखोरीची भूमिका घेतली. बालविवाहाला विरोध करत डॉ. रखमाबाईंनी न्यायालयाच्या आदेशानुसार नवऱ्याला पोटगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमलाताई सोहनी आणि पहिल्या महिला वकील कॉर्नेलिया सोराब यांनाही मोठा संघर्ष करावा लागला. अशा थोर महिलांचा आदर्श आजच्या महिलांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा मुठे, कांचन शहा, तिलोत्तमा पाटील, विद्या हजारे, करुणा सोनार, सरोज भांडारकर, वसुंधरा लांडगे, माधुरी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमास शहरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
