४३ वर्षांनी शाळेच्या अंगणात पुन्हा फुलली मैत्री. – सोनगीर येथील एन. जी. बागुल हायस्कूलच्या १९८१–८२ दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात..

सोनगीर /प्रतिनिधी
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग जरी संकुचित झाल्यासारखे वाटत असले, तरी दैनंदिन संसार व प्रपंचात व्यस्त असलेल्या माणसाला कधी ना कधी फुरसतीचे, आनंदाचे क्षण हवेतच. असे क्षण जर जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीतून मिळत असतील, तर त्या आनंदाला वेगळीच उंची प्राप्त होते. याच भावनेतून सोनगीर येथील एन. जी. बागुल हायस्कूलमध्ये सन १९८१–८२ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेल्या मित्र-मैत्रिणींनी तब्बल ४३ वर्षांनंतर स्नेह मेळावा (गेट-टुगेदर) आयोजित केला.
या बॅचमधील काही मित्रांनी पुढाकार घेऊन सर्वांना एका माळेत गुंफण्याचा संकल्प केला. त्यानुसार १९८१–८२ च्या दहावीतील सर्व मित्र-मैत्रिणींची नावे व संपर्क क्रमांक संकलित करून प्रत्यक्ष नियोजनास सुरुवात करण्यात आली. सर्वांशी संपर्क साधणे, कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणे आणि हा सोहळा कायम स्मरणात राहील असा व्हावा, यासाठी विशेष तयारी करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या शाळेत मित्र-मैत्रिणी व गुरुजनांसोबत शिक्षण घेतले, त्याच शाळेत हा मैत्री उत्सव साजरा करण्याचा योग आला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांशी संपर्क साधून रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी स्नेह मेळाव्याची तारीख निश्चित करण्यात आली. सकाळी नऊ वाजेपासून तब्बल ४३ वर्षांनंतर दहावीचे मित्र-मैत्रिणी एकत्र जमू लागले. स्थानिक मित्र-मैत्रिणी अधूनमधून भेटत असले तरी, दहावीनंतर थेट ४३ वर्षांनी काही जण या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच समोरासमोर आले. एकत्र नाश्ता, चहा व भोजन केल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर दिवसभर मैत्रीचा आनंद झळकत राहिला आणि क्षणभर सर्वजण जणू भूतकाळातच हरवून गेले.
नाश्त्यानंतर शाळेची घंटा वाजताच सर्व मित्र-मैत्रिणी शालेय परंपरेप्रमाणे प्रार्थनेसाठी मैदानावर जमले. शिस्तीत रांगेत उभे राहून राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सर्वजण रांगेतच वर्गात दाखल झाले आणि ४३ वर्षांनंतर पुन्हा त्याच दहावीच्या वर्गात गुरुजनांसह दिमाखदार सोहळ्याला सुरुवात झाली. उपस्थित प्रत्येकाने आपल्या ४३ वर्षांच्या जीवनप्रवासाची थोडक्यात माहिती सांगितली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एच. एस. विसपुते हे होते. दीपप्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष सुनील बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव चंद्रशेखर बागुल, खजिनदार अविनाश महाजन, संचालक अमित बागुल तसेच वर्गशिक्षक जी. जी. जैन, एस. सी. जैन, एल. एन. पाटील, एस. एस. पाटील, अहिरराव, नांदोळे, के. बी. दुसाने, व्ही. एस. सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांत नोकरी व उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी आपल्या मनोगतातून कौतुक केले.
या प्रसंगी १९८१–८२ च्या दहावीच्या बॅचतर्फे शाळेला गोदरेज कपाट भेट देण्यात आले. तसेच डी. झेड. इंदासराव यांनी ११ हजार रुपये, माधुरी नांदोळे यांनी ५ हजार रुपये आणि नांदोळे सर यांनी ५ हजार रुपये अशी देणगी जाहीर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरिफ खान पठाण व रमेश गुजर यांनी केले. उपस्थित सर्व शिक्षक व लांबून आलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींचे आभार व प्रास्ताविक दिलीप माळी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रल्हाद जाधव, गोरख पाटील, दीपक पाटील, प्रकाश गुजर, सुरेश पाटील, दिलीप माळी, उत्तम महाजन, रमेश गुजर, पराग पटेल, चंद्रशेखर परदेशी, माधुरी नांदोळे, सीमा बागुल आदींनी विशेष परिश्रम घेतले.
हा स्नेह मेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून, आठवणींचा ठेवा जपणारा आणि मैत्रीचे नाते अधिक घट्ट करणारा अविस्मरणीय क्षण ठरला.
