पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांसाठी ५ लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण उपलब्ध..

अमळनेर/ आबिद शेख
आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. अशोक आधार पाटील यांच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांसाठी ५ लाख रुपयेपर्यंतचे अपघात विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदर विमा संरक्षण भारतीय पोस्ट खात्याच्या प्रतिनिधींमार्फत राबविण्यात आले असून, यामुळे पत्रकारांना आर्थिक सुरक्षिततेचा मोठा आधार मिळणार आहे. विशेष म्हणजे, ज्या पत्रकारांचे आधीच अपघात विमा संरक्षण अस्तित्वात आहे, त्यांनाही हेच ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण नूतनीकरण (रिन्यूअल) करून देण्यात येणार आहे.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणारा हा उपक्रम स्तुत्य असून, अनेक पत्रकारांनी या विमा योजनेचा लाभ घेतला आहे. या उपक्रमामुळे पत्रकारांच्या कुटुंबीयांनाही भविष्यातील अनिश्चित परिस्थितीत आर्थिक दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
या उपक्रमाबद्दल पत्रकार बांधवांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. अशोक आधार पाटील तसेच भारतीय पोस्ट खात्याच्या प्रतिनिधींचे आभार मानले असून, पत्रकारांच्या हितासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
