अमळनेरातील पत्रकार भवनात पत्रकार दिन सोहळा उत्साहात साजरा..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार भवन (योगा भवन) अमळनेर येथे उत्साहात पार पडले. हा सोहळा सर्वच पत्रकारांच्या एकतेचे प्रतीक ठरला.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, व्हॉइस ऑफ मीडिया तसेच महाराष्ट्र पत्रकार संघटना या तिन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पत्रकार बांधवांनी सामूहिक पूजन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिगंबर महाले, पांडुरंग पाटील व संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारांना मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून निवड व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच खान्देश शिक्षण मंडळाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवक यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास मंचावर ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर, किरण पाटील, चंद्रकांत काटे, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत, व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष उमेश काटे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे प्रविण बैसाणे यांच्यासह तिन्ही पत्रकार संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देत पत्रकारांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जे. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश काटे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे सचिव जितेंद्र ठाकूर तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार एकत्र आल्याने या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
