यशानंतर अवघ्या दहा दिवसांत अपप्रवृत्ती पुन्हा सक्रिय – आमदार अनिल पाटील यांचा गंभीर आरोप..
अमळनेर /आबिद शेख
गेल्या सहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात माजी आमदारांचे गैरप्रकार थांबवले होते. मात्र नगरपालिका निवडणुकीत यश मिळताच निकालानंतर अवघ्या दहा दिवसांतच अपप्रवृत्तीने पुन्हा तोंड वर काढले असल्याचा गंभीर आरोप आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
पत्रकारांशी संवाद साधताना आमदार पाटील म्हणाले की, शिवसेनेचे डॉ. बाविस्कर नगराध्यक्षपदी निवडून आले असले तरी ते त्यांचे स्वतःचे क्रेडिट नाही. संख्याबळाच्या दृष्टीने आमचे एक-दोन नगरसेवक जास्त निवडून आले असतानाही आम्ही पराभव स्वीकारत विरोधात बसण्याची भूमिका घेतली आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या.
मात्र पदग्रहण सोहळ्यात करण्यात आलेले बेताल व अपमानास्पद वक्तव्य कोणालाही सहन होणारे नाही. संत सखाराम महाराज व पु. सानेगुरुजी यांच्या पावन भूमीत महिलांचा असा अवमान सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यावर काहींनी टाळ्या वाजवल्याबद्दलही त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला.
राजकारण, नोकरी किंवा उद्योगात कार्यरत असलेल्या महिला नवऱ्याच्या ताब्यात राहत नाहीत का, असा सवाल उपस्थित करत आमदार पाटील म्हणाले की, त्यांच्या पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेची सेवा करत असून हे कार्य भविष्यातही अखंडपणे सुरूच राहील.
विकासावर टीका करणाऱ्यांनी गेली पाच वर्षे शहरात फिरकलेच नाही, त्यामुळे झालेला विकास त्यांना दिसत नसल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील काळात माजी आमदार चौधरी ज्या-ज्या रस्त्यांवरून जातील, ते सर्व रस्ते माझ्याच कार्यकाळात झालेले असतील, असा दावा करत “झालेला नाही असा कोणता विकास आहे ते समोरासमोर येऊन सांगा,” असे खुले आव्हान त्यांनी दिले.
या संपूर्ण वक्तव्यातून महिला सक्षमीकरण रोखण्याचा प्रयत्न दिसून येत असून अशा अपप्रवृत्तींचा आमचा तीव्र विरोध आहे, असे सांगत आमदार म्हणून आई-बहिणींच्या सन्मानाचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी असून ती मी नक्कीच पार पाडणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
अमळनेरकर जनतेला हेच पाहायचे होते का, असा सवाल उपस्थित करत महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे सांगत त्यांनी आपले भाषण समाप्त केले.
