माजी आमदार शिरीष चौधरींच्या वादग्रस्त वक्तव्याचा अमळनेरात तीव्र निषेधमहिला व कार्यकर्त्यांचा उद्रेक; पालिकेसमोर पुतळादहन, जाहीर माफीची मागणी..

अमळनेर /आबिद शेख
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात आमदार अनिल पाटील यांच्या पत्नीबाबत केलेल्या आक्षेपार्ह व चुकीच्या वक्तव्यामुळे अमळनेर शहर व तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या वक्तव्याचा निषेध करत काल शहरात महिला, कार्यकर्ते व तरुणांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने अमळनेर नगरपालिकेसमोर एकत्र येत शिरीष चौधरी यांच्या पुतळ्यास चप्पल-जोडे मारून पुतळादहन केले.
माजी आमदारांच्या वक्तव्याची क्लिप फेसबुक लाईव्हमुळे शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. यानंतर सोशल मीडियावरून निषेधाची सुरुवात झाली आणि दुपारी तीन वाजल्यानंतर हा रोष रस्त्यावर उतरला. महिलांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महिलेच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित केला. महिलांनी मनोगत व्यक्त करत, अशा प्रकारचे वक्तव्य हे संपूर्ण अमळनेर तालुक्यातील महिलांचा अपमान असल्याचे ठामपणे सांगितले आणि शिरीष चौधरी यांनी आमदारांच्या पत्नीची जाहीर माफी मागावी, अशी ठोस मागणी केली.
निषेध आंदोलनादरम्यान महिलांनी चौधरी यांच्या पुतळ्यास बांगड्यांचा हार घालून चप्पल-जोडे मारले व त्यानंतर पुतळादहन करण्यात आले. यानंतर मोर्चाच्या स्वरूपात हा जमाव माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या स्टेशन रोडवरील निवासस्थान व कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला. तेथेही तीव्र घोषणाबाजी झाली. काही ठिकाणी टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. परिस्थिती तणावपूर्ण होत असतानाच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे शहरातील शांतता भंग होण्याची स्थिती निर्माण झाली होती.
यानंतर हा निषेध मोर्चा आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचला. तेथे भाजपाचे ज्येष्ठ नेते अॅड. व्ही. आर. पाटील, हिरालाल पाटील, भागवत पाटील, मनोज पाटील, प्रा. मंदाकिनी भामरे आदींनी मनोगत व्यक्त करून तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. “हा प्रकार अमळनेर तालुक्यातील प्रत्येक महिलेचा अपमान आहे. महिलांचा अपमान करणाऱ्यांना महिलांनी त्यांची जागा दाखवली आहे,” असे यावेळी सांगण्यात आले. एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांचा सन्मान करण्याची भाषा आणि दुसरीकडे महिलांचा सन्मान न करणाऱ्यांना पाठीशी घालण्याची वृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
