न्यू लक्ष्मी टाकीसमोर मोठा अपघात टळला – भुयारी गटारात मालवाहू ट्रक फसला..
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर शहरातील न्यू लक्ष्मी टाकी परिसरात आज सायंकाळी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. रस्त्याच्या कडेला असलेल्या भुयारी गटाराच्या चारीत भरलेला मालवाहू ट्रक अचानक फसल्याने परिसरात काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर ट्रक रस्त्याच्या बाजूने जात असताना त्याच्या मागील चाकांनी भुयारी गटाराच्या कडेला असलेली चारी खचली. त्यामुळे ट्रक पूर्णपणे तिरपा होऊन अडकला असून, तो उलटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दोन जेसीबीच्या मदतीने ट्रक बाहेर काढला
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर दोन जेसीबीच्या सहाय्याने ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. या कारवाईदरम्यान काही काळ रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ट्रक बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
नागरिकांचा संताप – रस्त्याच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या भुयारी गटार व रस्त्याच्या मजबुतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
“याच ठिकाणी एखादा दुचाकीस्वार किंवा रिक्षा असती तर मोठी दुर्घटना घडली असती,” अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केली.
प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
या घटनेमुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी दुरुस्ती करून भविष्यातील संभाव्य धोका टाळावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
