अमळनेर नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा १ जानेवारी रोजी..

अमळनेर/ आबिद शेख
अमळनेर नगरपरिषदेत मा. आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा भव्य पदग्रहण सोहळा गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे आयोजन नगरसेवक शेख नविद अहमद मुशीरोदीन यांच्या वतीने करण्यात आले असून समस्त नागरिकांना सादर आमंत्रण देण्यात आले आहे.
सदर पदग्रहण समारंभ सायंकाळी ४ वाजता सुरू होणार असून, कार्यक्रमाची सुरुवात फरशी रोड येथील कार्यालयापासून होऊन नाट्यगृहापर्यंत मिरवणुकीच्या स्वरूपात होणार आहे. या ऐतिहासिक व आनंदोत्सवाच्या क्षणी शहरातील विविध मान्यवर, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या शुभप्रसंगी प्रभाग क्रमांक ४ मधील सर्व सन्माननीय नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून पदग्रहण सोहळ्याची शोभा वाढवावी, असे विनम्र आवाहन नगरसेवक शेख नविद अहमद मुशीरोदीन यांनी केले आहे. नागरिकांची उपस्थिती ही आपल्या कार्याला बळ देणारी व प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
हा पदग्रहण सोहळा अमळनेर नगरपरिषदेच्या राजकीय व सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
