२५ लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल मुख्य आरोपी अनंत निकम अटकेत..

0
New-Doc-12-31-2025-22.48.jpg

आबिद शेख /अमळनेर. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी अमळनेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक, चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून अनंत रमेश निकम (रा. श्रीकृष्ण कॉलनी, अमळनेर) यांच्याविरोधात बीएनएस कायदा कलम ३०८ (२), ३०८ (३) अन्वये खंडणीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अशोक खलाणे हे चाळीसगाव शहरातील महात्मा फुले सामाजिक शिक्षण विकास मंडळ, चाळीसगाव या संस्थेत सचिव पदावर कार्यरत असून सदर संस्थेअंतर्गत एकूण १४ अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालये चालविली जातात. संस्थेच्या अखत्यारितील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथील १५ शिक्षकांच्या गैरवर्तनामुळे फिर्यादी यांनी शिस्तभंगाची कारवाई करत संबंधित शिक्षकांना सेवा समाप्तीचे आदेश दिले होते.
या कारवाईचा राग मनात धरून संबंधित शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे संस्थेविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यातून संस्थेवर प्रशासक नेमण्याचा आदेश झाला होता. मात्र या आदेशाविरोधात फिर्यादी यांनी मा. उच्च न्यायालयात धाव घेतली असता प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला स्थगिती मिळाली होती. तसेच फिर्यादी यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातून त्यांनी जामीन मंजूर करून घेतलेला असून सदर प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत.
दरम्यान, दिनांक ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी अनंत रमेश निकम यांनी फेसबुकवरील “अनंत निकम” या प्रोफाईलवरून फिर्यादी व त्यांच्या संस्थेबाबत खोटी व बनावट माहिती प्रसारित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दिनांक ०९/११/२०२५ व १४/११/२०२५ रोजी आरोपीने आपल्या साथीदारांमार्फत फिर्यादी यांना अमळनेर येथे बोलावून तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
पैसे न दिल्यास फिर्यादी यांच्याविरोधात खोटी माहिती, बनावट व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करणे, तसेच दखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्यांत अडकवून आयुष्यभर तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी नगराज चिंतामण वाघ यांच्यामार्फत खंडणीची रक्कम कमी करण्याबाबत कळविल्यानंतर आरोपीने ४ ते ५ लाख रुपये देण्याचा अंतिम दम दिला होता.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या फिर्यादी यांनी अखेर अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी अनंत रमेश निकम यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक सो. यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.
प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने पुढील तपासात आणखी महत्त्वाचे धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed