अमळनेरमध्ये राजे शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद व्यायाम शाळा व प्रतापआबा मित्र परिवारातर्फे गरजूंसाठी ब्लँकेट वाटप..

अमळनेर /आबिद शेख
शहरातील निराधार, गरजू व गोरगरीब नागरिकांना हिवाळ्याच्या कडाक्यापासून दिलासा मिळावा, या उद्देशाने अमळनेर राजे शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद व्यायाम शाळा व प्रतापआबा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लँकेट वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये सुमारे ४० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक प्रताप शिंपी व आबा बबलू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. थंडीच्या दिवसांत गरजूंना उब मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ब्लँकेट वाटपाच्या वेळी जीवन पवार, गिरीश पाटील, रुपेश धोबी, सोनू पाटील, गणेश पाटील, सागर शिंपी, सुरज शिंपी व पवन शिंपी यांची उपस्थिती होती. सर्व उपस्थितांनी प्रत्यक्ष रस्त्यावर व वसाहतींमध्ये जाऊन गरजू नागरिकांना ब्लँकेट वितरित केली.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी सांगितले की, “समाजसेवा करणे हा आमचा छंद आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्याच्या भावनेतून दरवर्षी सातत्याने असे उपक्रम राबविले जात आहेत.”
