अमळनेर शहरात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यातशाह आलम नगर व अमलेश्वर नगरातील नागरिक त्रस्त..

अमळनेर/ आबिद शेख
अमळनेर शहरातील शाह आलम नगर व अमलेश्वर नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून पिण्याच्या पाण्याला घाण वास व तीव्र दुर्गंधी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दिनांक २९ रोजी अमलेश्वर नगर भागात अत्यंत दूषित पाणीपुरवठा करण्यात आला. पाणी मळकट असून त्यावर पांढऱ्या रंगाचा फेस दिसत होता तसेच दुर्गंधी येत होती. अनेक नागरिकांनी हे पाणी आधी साठवलेल्या स्वच्छ पाण्यात मिसळल्याने संपूर्ण साठवलेले पाणी फेकून द्यावे लागले. यापूर्वीही या प्रभागात अनेक दिवसांपासून हीच समस्या सातत्याने जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
तापी नदीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरात अनियमित आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. अमलेश्वर नगर भागात कधी सात दिवसांनी, कधी पाच दिवसांनी तर कधी दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तोही कोणत्याही ठराविक वेळेशिवाय कधी पहाटे, कधी दुपारी तर कधी संध्याकाळी होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
काही दिवसांपूर्वी खोदकामादरम्यान पाईपलाईन फुटल्याने गढूळ पाणी येत होते. त्यानंतर दुरुस्ती करण्यात आल्यानंतर काही काळ शुद्ध पाणीपुरवठा झाला; मात्र पुन्हा दुर्गंधीयुक्त पाणी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, नागरिकांनी नगरपरिषदेकडून तात्काळ उपाययोजना करून नियमित, स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
