‘काळी माती’च्या माध्यमातून विश्वात दरवळतोय अमळनेरच्या मातीचा सुगंध…! अमळनेरचे सुपुत्र डॉ. हेमंतकुमार महाले यांचा चित्रपट आज अमळनेरात प्रदर्शित..

0
New-Doc-12-25-2025-22.38.jpg



अमळनेरच्या मातीत जन्मलेल्या आणि संगीतविश्वात आपल्या कर्तृत्वाने जागतिक स्तरावर नाव कमावलेल्या डॉ. हेमंतकुमार महाले यांनी निर्माता व दिग्दर्शक म्हणून साकारलेला ‘काळी माती’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट आज शुक्रवार, दि. 26 डिसेंबर रोजी अमळनेर येथील एसएस मल्टिप्लेक्स येथे सकाळी 11 वाजता प्रदर्शित होत आहे. अमळनेरबरोबरच राज्यातील विविध ठिकाणीही हा चित्रपट एकाच वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘काळी माती’ या चित्रपटाने अल्पावधीतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी दखल घेतली असून, केवळ एका वर्षात तब्बल 444 सर्वोत्तम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झाले आहेत. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली असून, आता या अभूतपूर्व यशाची दखल घेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडेही डॉ. महाले यांनी अधिकृत अर्ज सादर केला आहे.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ डॉ. हेमंतकुमार महाले हे हेमंतकुमार अ‍ॅण्ड पार्टी व हेमंतकुमार म्युझिकल्स या माध्यमातून जगभर गीत, संगीत व नृत्याचे कार्यक्रम सादर करीत आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनलला लाखो फॉलोअर्स आणि कोट्यवधी व्ह्यूज असून, त्यांच्या नावावर अनेक प्रतिष्ठित विक्रम व पुरस्कार आहेत.
संगीत किंवा चित्रपट क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन डॉ. महाले यांनी मिळवलेली ही यशस्वी वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता त्यांनी संगीत व सिनेविश्वात निर्माण केलेली ओळख विशेष कौतुकास्पद आहे. त्यांच्या म्युझिकल ग्रुपमध्ये मंगेशकर परिवारासह देशातील सर्व दिग्गज गायक व वादक सहभागी झाले असून, अनेक उभरत्या कलाकारांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आज हेच कलाकार त्यांच्या आशीर्वादाने नावलौकिक व आर्थिक यश मिळवत आहेत.
‘काळी माती’ हा चित्रपट एका सत्य संघर्षकथेवर आधारित असून, शेतकऱ्याच्या जीवनातील संघर्ष आणि जिद्द याचे प्रभावी चित्रण यात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्याच्या जीवनावर ही कथा आधारित आहे, त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास पाचारण करून सन्मान केला होता.
आपल्या मातीशी नाळ जोडणारा, अमळनेरचा गौरव वाढवणारा हा चित्रपट अमळनेरकरांनी आवर्जून पाहावा, असे भावनिक आवाहन डॉ. हेमंतकुमार महाले यांनी केले आहे. ‘काळी माती’च्या माध्यमातून अमळनेरच्या मातीचा सुगंध आज संपूर्ण विश्वात दरवळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed