अमळनेरमध्ये बनावट साधूंचा सुळसुळाट; गुंगीच्या वासाने फसवणुकीचा प्रयत्न उघड..

0
New-Doc-12-26-2025-07.26.jpg


अमळनेर/आबिद शेख
अमळनेर शहरात नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली असून, साधूंच्या वेशात फिरणाऱ्या बहिरूपी ढोंगी टोळ्यांचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पाच ते सहा जणांच्या टोळीत फिरणाऱ्या या बनावट साधूंनी नागरिकांना फसवण्याचा डाव आखल्याचे समोर आले आहे.
धुळे रोडवरील तुळजाई हॉस्पिटल परिसरात ही घटना घडली. चार जण साधूंच्या वेशात एका दुकानदाराजवळ आले व सुगंध दाखवण्याच्या बहाण्याने किंवा गुंगी आणणाऱ्या औषधाचा वास सुंघवून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासात या टोळीचा उद्देश दुकानदाराकडील ₹5,100 रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू हडप करण्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेत सुदैवाने समोरच्या दुकानातील सजग नागरिकाने संशयास्पद हालचाली वेळेत ओळखून निरीक्षण ठेवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा दुकानदाराचे रोख पैसे व मौल्यवान वस्तू निश्चितच गमावल्या गेल्या असत्या, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयित बहिरूपी साधूंना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. या टोळीने याआधी इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या फसवणुका केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाचा सावधतेचा इशारा

  • साधू, फकीर किंवा भोंदूबाबांच्या वेशातील अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका.
  • कोणताही वास सुंघायला देणे, अंगावर फुंकर मारणे, तावीज, औषध किंवा प्रसाद घेण्यास स्पष्ट नकार द्या.
  • दुकानात किंवा घरात अशा व्यक्तींना एकटे सोडू नका.
  • संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या.
    अशा ढोंगी बहिरूप्यांमुळे खऱ्या साधू-संतांची बदनामी होत असून समाजात गैरसमज निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून एकमेकांना माहिती देणे व पोलिसांना सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed