अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय उलथापालथ मतदारांनी प्रस्थापित नेत्यांना नाकारत नव्या नेतृत्वाला संधी दिली..

0
New-Doc-12-24-2025-22.56.jpg


अमळनेर | आबिद शेख
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा मतदारांनी आपला कौल देत शहराच्या राजकारणाचे चित्रच बदलून टाकले आहे. अनेक वर्षांपासून राजकारणात वर्चस्व गाजवणाऱ्या मातब्बर व प्रस्थापित नेत्यांना स्पष्टपणे नाकारत, सामान्य कार्यकर्ते, नव्या चेहऱ्यांना आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. या निकालामुळे अमळनेरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडून आली असून, शहराच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
या निवडणुकीत सलीम टोपी, संजय मराठे, प्रताप शिपी, विजु लाबोंडे, बबली पाठक, हाजी शेखा मिस्त्री, राजेश बापू, मनोज बापू, संजय पहलवान, नरु चौधरी, श्याम पाटील, भाऊसाहेब महाजन, कैलास भावसार, प्रताप साळी, सुनिल भामरे यांसारख्या अनेक प्रस्थापित व प्रभावी नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हे सर्व नेते आपल्या-आपल्या प्रभागात मजबूत स्थितीत मानले जात होते. मात्र यावेळी जनतेने वेगळा निर्णय घेत त्यांच्या दाव्यांना छेद दिला.
विशेष म्हणजे, अनेक प्रभागांमध्ये नवख्या उमेदवारांनी व सामान्य कार्यकर्त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळवत विजय संपादन केला. यावरून मतदारांचा कल हा केवळ नाव, वजनदार ओळख किंवा जुनी राजकीय पकड यांवर न राहता प्रत्यक्ष कामगिरी, जनसंपर्क आणि प्रामाणिकपणाकडे वळल्याचे स्पष्ट होते.
या निकालामुळे अमळनेरच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. जनतेने आता “काम कराल त्यालाच संधी” असा स्पष्ट संदेश दिला असून, येत्या काळात नगरपरिषदेतील नव्या नेतृत्वावर विकास, पारदर्शकता आणि जबाबदारीची मोठी अपेक्षा असणार आहे.
एकूणच, अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ ही केवळ सत्ता बदलाची नव्हे, तर विचारसरणी बदलाची निवडणूक ठरल्याचे चित्र असून, या निकालाचे पडसाद आगामी स्थानिक राजकारणावर दीर्घकाळ उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed