अमळनेरमध्ये वकिलाला जीवे ठार मारण्याची धमकी; अमळनेर वकील संघाचा तीव्र निषेध, दोषींवर कठोर कारवाईची मागणी..

अमळनेर | आबिद शेख
अमळनेर येथील वकील संघाचे सदस्य अॅड. मंगेश देविदास पाटील यांना फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी देत अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी अमळनेर वकील संघाच्या वतीने मा. उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर यांच्याकडेशेख निवेदन देत दोषी व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. मंगेश देविदास पाटील यांनी प्रणोती देविदास चिमूरकर यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. याच कारणावरून प्रदीप राज कुलकर्णी (रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.47 वाजता 7219429066 या मोबाईल क्रमांकावरून फोन करून अॅड. पाटील यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आहे. ही घटना अॅड. पाटील न्यायालयात काम करत असतानाच घडल्याने वकील वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 351(2) व 351(4) अन्वये एनसीआर क्र. 1290/2025 नोंदविण्यात आलेला आहे. तसेच दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी अमळनेर वकील संघाची तातडीची बैठक घेऊन सदर प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला.
वकिलांवर हल्ले, धमक्या व दबावाच्या घटना महाराष्ट्रात सातत्याने वाढत असून, काही ठिकाणी वकील बांधवांना आपला जीवही गमवावा लागल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारकडे वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी वकील संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र अद्याप असा कायदा लागू न झाल्याने वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे वकील संघाने नमूद केले आहे.
या प्रकरणात दोषींवर तातडीने कठोर कारवाई करून वकिलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी अमळनेर वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
