साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न..

अमळनेर | आबिद शेख
अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी विषयाची विशेष मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. ही कार्यशाळा दुपारी १२ ते ३ या वेळेत घेण्यात आली असून विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक शरद बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना तीन तास सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेची सुरुवात माजी आमदार व संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गुलाबराव पाटील तसेच साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी शरद पाटील यांनी बोर्ड परीक्षेतील इंग्रजी विषयाचे महत्त्व स्पष्ट करत, ऍक्टिव्हिटी शीट, व्याकरण, लेखन कौशल्य (रायटिंग स्किल) आदी घटक विद्यार्थ्यांना सोप्या व समजण्यासारख्या भाषेत समजावून सांगितले. परीक्षेत गुण वाढवण्यासाठी आवश्यक टिप्स व योग्य लेखन पद्धतीचे मार्गदर्शनही त्यांनी केले.
इयत्ता दहावीच्या अ, ब, क, ड या चारही तुकड्यांमधील सुमारे २०० विद्यार्थी या कार्यशाळेस उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.
कार्यशाळेस विद्यालयाचे प्राचार्य सुनील पाटील, शिक्षक प्रतिनिधी श्री. चौधरी, इंग्रजी शिक्षिका विद्या पाटील, इंग्रजी शिक्षक समाधान पाटील, गणित शिक्षक डी. ए. धनगर, देवेंद्र महाजन, श्री. बागल आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन देवेंद्र महाजन यांनी मानले.
