अमळनेर शहरातील दुकानफोडी प्रकरणातील अट्टल चोर अंकलेश्वरहून अटकेत..

0
New-Doc-12-23-2025-09.35.jpg


अमळनेर | आबिद शेख
अमळनेर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत पत्रा व शेड कापून चार ते पाच दुकाने फोडून चोरी करणाऱ्या अट्टल चोराला अमळनेर पोलिसांनी गुजरातमधील अंकलेश्वर येथून अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.
शहरात नुकत्याच घडलेल्या दुकानफोडीच्या घटनांनंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात एक संशयित चोरी करताना स्पष्ट दिसून आला. फुटेजच्या आधारे त्याची ओळख प्रशांत जगन वालडे (मूळ रा. गोरंगावले, ता. चोपडा, सध्या मुक्काम – अंकलेश्वर, जि. भरूच, गुजरात) अशी पटली.
तपासादरम्यान प्रशांत वालडे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही अनेक चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, गणेश पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे व विनोद संदानशीव यांच्या पथकाला अंकलेश्वर येथे पाठविण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा मागोवा घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीला अमळनेर येथे आणून अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेमुळे शहरातील व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed