बदलत्या जमान्यात पालकांनी भूमिका बदलावी – स्मार्ट गर्ल कार्यशाळेत राजेंद्र भुतडा यांचे आवाहन..

0
New-Doc-12-23-2025-07.22.jpg


अमळनेर | आबिद शेख
बदलत्या काळानुसार मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनीही आपल्या भूमिकेत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे, असे आवाहन ज्येष्ठ प्रशिक्षक राजेंद्र भुतडा (नाशिक) यांनी केले. ते भारतीय जैन संघटनेच्या वतीने अमळनेर येथील तेरापंथ भवनात आयोजित दोन दिवसीय स्मार्ट गर्ल कार्यशाळेच्या समापनप्रसंगी “माता–पिता संवाद” या शेवटच्या सत्रात बोलत होते. या कार्यशाळेत १३ ते १९ वयोगटातील ३५ मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे खानदेश विभागाध्यक्ष प्रा. चंद्रकांत डागा, माजी विभागाध्यक्ष प्रा. अरुण कोचर, विभाग उपाध्यक्ष व प्रकल्पाचे खानदेश प्रमुख सुमित मुनोत, जिल्हाध्यक्ष निर्मल बोरा, जिल्हा सचिव दर्शन देशलहरा, प्रकाश छाजेड, सचिन ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. चंद्रकांत डागा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांचा स्मार्ट गर्ल हा ड्रीम प्रोजेक्ट असून समाजातील मुलींना स्वतःची ओळख निर्माण करून सुरक्षित व आत्मविश्वासाने जीवन जगता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. संघटनेच्या इतर सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत त्यांनी विवाह जुळविण्यासाठी नवीन पारिणय पथ व दिलं का जिकशा हे कार्यक्रम सुरू असल्याचे सांगितले तसेच विवाहाला ५ ते ७ वर्षे झालेल्या दांपत्यांसाठी दंपत्ती सक्षमीकरण कार्यशाळा घेण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षक राजेंद्र भुतडा यांनी मुलींसाठी स्व-ओळख, निवड व निर्णय, संवाद व नाते, मैत्री व प्रलोभन, मासिक पाळी : स्वच्छता व पोषण, आत्मसन्मान व आत्मरक्षा अशा सहा सत्रांत मार्गदर्शन केले. शेवटच्या सातव्या सत्रात पालकांना उद्देशून बोलताना त्यांनी “मुलींचे मित्र बना, त्यांची इतरांशी तुलना करू नका, त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडू द्या, त्यांना समजून घ्या आणि सामाजिक व सामान्य ज्ञानासोबत जीवनकौशल्ये शिकवा,” अशा मौल्यवान टिप्स दिल्या. प्रा. अरुण कोचर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेत सहभागी ईशा शाह, भव्य शाह, प्रचिती मुंदडा, गोल्डी कोचर, महिमा जैन, गुंजन लोढा, काव्या सिंघवी, उर्वी शाह, हिरल फिरोशिया, जिया शाह आदी मुलींनी कार्यशाळेबद्दलचे सकारात्मक अनुभव कथन केले.
सूत्रसंचालन शहर सचिव प्रतीक लोढा यांनी तर आभारप्रदर्शन अध्यक्ष रोहित सिंघवी यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा सदस्य नूतन पारख व शहर कोषाध्यक्ष प्रणिता लोढा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed