प्रभाग क्र. ४ मधून नविद शेख यांचा दणदणीत विजय; समाजकार्याला मिळाली मतदारांची पसंती..


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ४ (सर्वसाधारण जागा) येथून नविद अहमद मुशीरोद्दीन शेख यांनी दणदणीत विजय संपादन केला असून, त्यांच्या विजयानंतर प्रभागासह संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. समाजहितासाठी सदैव तत्पर असलेल्या नविद शेख यांच्या प्रामाणिक कार्याची पोच मतदारांपर्यंत पोहोचल्याचे या विजयातून स्पष्ट झाले आहे.
नविद शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. स्वच्छता मोहिमा, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम तसेच समाजकल्याणाच्या विविध कामांमुळे त्यांनी शहरवासीयांचा विश्वास संपादन केला आहे. विशेषतः युवकांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून, त्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमी पुढाकार घेत असल्याने युवकवर्गाचा त्यांना मोठा पाठिंबा लाभला.
स्थानिक नागरिकांमध्ये नविद शेख यांच्याविषयी विश्वास व आदराचे वातावरण आधीपासूनच होते. प्रामाणिकपणा, साधी जीवनशैली आणि सर्वसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते हीच त्यांच्या विजयाची खरी ताकद ठरली. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी विकास, पारदर्शक प्रशासन आणि प्रभागातील मूलभूत सुविधांवर भर देत मतदारांशी थेट संवाद साधला होता.
नविद शेख यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. परिसरात फटाक्यांची आतषबाजी व अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध सामाजिक, राजकीय व युवक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या विजयामुळे प्रभाग क्रमांक ४ च्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या असून, नविद शेख या अपेक्षांना नक्कीच न्याय देतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

