अमळनेरात राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या ६९ व्या पुण्यतिथी निमित्त पूजन व माल्यार्पण सोहळा उत्साहात संपन्न..

आबिद शेख/अमळनेर
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेर युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने शहरात पूजन व माल्यार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भजनाने कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात झाली.
सर्वप्रथम संत गाडगेबाबा उद्यानातील राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संत गाडगेबाबा चौकातील स्मारकास माल्यार्पण करण्यात आले. हा सोहळा धरणगाव–नांदेड येथील समाज बांधव अरुण अमृत वाघ, माजी नगरसेवक अविनाश जाधव, परशुराम महाले, अमळनेर युवा परीट धोबी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव विजय वाघ, प्रा. अनिल वाल्हे, प्रा. अनिल पवार, अशोक येशी, अनिल मांडोळे, डॉ. हिम्मत सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
यावेळी गाडगे महाराजांच्या कार्याचा गौरव करताना वक्त्यांनी सांगितले की, राष्ट्रसंत गाडगे बाबा हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले थोर समाजसुधारक होते. दीन-दलित, पीडित, अनाथ व अपंगांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले. सामाजिक अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा यांवर त्यांनी कठोर टीका केली.
“देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकारांकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र व चमत्कारांवर विश्वास ठेवू नका” अशी शिकवण देत माणसातच देव आहे हा विचार त्यांनी समाजात रुजवला. समाजकार्यासाठी मिळालेल्या देणगीतून त्यांनी अनाथालये, धर्मशाळा, आश्रम व विद्यालये सुरू केली. दीन-दुबळे, अपंग व अनाथ हेच त्यांच्यासाठी देव होते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. अमळनेर युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने रक्तदात्यांना राष्ट्रसंत गाडगे बाबांची प्रतिमा भेट देण्यात आली.
या कार्यक्रमास विनोद जाधव सर, अनिल वाघ, गणेश नेरकर, भरत जावदेकर, दीपक सूर्यवंशी, मनोज चित्ते, दीपक वाल्हे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
