साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे बासरी वादन कार्यशाळा उत्साहात संपन्न..

0
New-Doc-12-21-2025-07.48.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर :साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बासरी वादन कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक पंडित विवेक सोनार हे या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक होते.
कार्यशाळेदरम्यान पंडित विवेक सोनार यांनी, “हृदयात प्रेम असेल तर बासरीतून सप्तसुरांची उधळण होते. स्वर माणसाला आनंदी करतात आणि माणसांवर, निसर्गावर व प्राण्यांवर प्रेम करायला शिकवतात,” असे विचार व्यक्त केले. साने गुरुजी यांच्या विचारांचा आपल्या जीवनावर खोल प्रभाव असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत खान्देशातील चोपडा येथून १२, एरंडोल येथून १०, जळगाव येथून १५, शहादा येथून ७, पुणे येथून ४ तर अमळनेर येथून १६ सहभागी उपस्थित होते. विविध भागांतून आलेल्या बासरीप्रेमींनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेचे प्रास्ताविक दर्शना पवार यांनी केले. त्या म्हणाल्या की, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या उभारणीसाठी मिळणारा लोकसहभाग आशादायी असून सरकारची उदासीनता असली तरी लोकसहभागातूनच हे कार्य पुढे जाईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
पंडित विवेक सोनार यांचे स्वागत चेतन भोई, शुभम पवार, दीपक लांब्होळे, सुवर्णा खराडे व अश्विनी वाघमोडे या युवकांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाळ नेवे, सचिन पाखले, दर्शना पवार, चेतन भाऊ सोनार, किशोर महाजन, तुषार पाटील व डॉ. अतूल चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्राचार्य अ. गो. सराफ यांनी फोनवरून पंडित विवेक सोनार व सर्व बासरी साधकांना आशीर्वाद दिले. “तुमच्या सप्तसुरांनी सारे जग प्रेममय व्हावे,” अशी सदिच्छा व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed