साधेपणाने विवाह केल्याबद्दल ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांच्या कुटुंबाचा मंगळ ग्रह सेवा संस्थेकडून सत्कार..

0
New-Doc-12-20-2025-07.35.jpg


अमळनेर / आबिद शेख
संपूर्ण भारताचा गौरव असलेले ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते नीरजजी चोप्रा यांनी १६ जानेवारी २०२५ रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे कु. हिमानी मोर यांच्याशी अत्यंत साध्या, पारंपरिक व हुंडामुक्त पद्धतीने विवाह केला. केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत, कोणताही दिखावा न करता आणि फक्त एक शगुन स्वीकारून पार पडलेला हा विवाह भारतीय संस्कृती, मूल्ये व आदर्श कुटुंबव्यवस्थेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
या प्रेरणादायी विवाहाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या वतीने नीरजजी चोप्रा यांच्या पानिपत (खंद्रागाव, हरियाणा) येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तब्बल १,१४१ किलोमीटर अंतर पार करून थेट घरच्या घरी जाऊन सत्कार करणारा हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या सत्कारप्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री. शरद कुलकर्णी, सेवेकरी श्री. दत्तात्रय पवार व श्री. आशिष चौधरी यांनी नीरज चोप्रा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी नीरजजी चोप्रा यांचे आजोबा धर्मसिंग चोप्रा व काका सुरेंद्रजी चोप्रा यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी काका सुरेंद्रजी चोप्रा म्हणाले, “अठरा वर्षांपूर्वी मी स्वतः केवळ पाच जणांच्या उपस्थितीत, एक रुपया शगुन घेऊन विवाह केला होता. तेव्हा समाजाकडून विरोध सहन करावा लागला. मात्र नीरजने हीच परंपरा पुढे नेत समाजासमोर आदर्श पायंडा घातला आहे.”
जागतिक कीर्ती मिळवूनही चोप्रा कुटुंब आजही गावातच वास्तव्यास असून शेतीशी आपली नाळ जपून आहे. अवघ्या १,६०० लोकसंख्या असलेल्या गावातील नीरज चोप्रा यांचे साधे, प्रशस्त व एकत्र कुटुंबाचे घर पाहून सेवेकरी भारावून गेले. गावातील मुलांना खेळाचे प्रशिक्षण देणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि आपल्या मातीशी नाते टिकवून ठेवणे हे या कुटुंबाचे विशेष वैशिष्ट्य आहे.
मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या वतीने चोप्रा कुटुंबाचा शाल-श्रीफळ, श्री मंगळ ग्रह देवतेची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. श्री. शरद कुलकर्णी यांनी सन्मानपत्राचे वाचन करून संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या हुंडामुक्त विवाह, कौटुंबिक मूल्ये व सामाजिक जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. श्री. दत्तात्रय पवार यांनी मंदिरातील विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचा
मंगळ ग्रह मंदिर दर्शनाचे निमंत्रण
या उपक्रमामुळे प्रभावित होऊन चोप्रा कुटुंबीयांनी संपूर्ण कुटुंबासह श्री मंगळ ग्रह मंदिर येथे दर्शनासाठी अवश्य येण्याचे आश्वासन दिले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे नीरजजी चोप्रा यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही; मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी मंदिराच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले.
साधा विवाह व हुंडामुक्त समाजाचा संकल्प
मंगळ ग्रह सेवा संस्थेमार्फत मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना “हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही, कौटुंबिक हिंसाचार होऊ देणार नाही, सुनेला मुलीसारखे वागवू, आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही” अशा आदर्श बाबींची शपथ दिली जाते. या मूल्यांना पूरक असे कार्य नीरजजी चोप्रा यांनी केल्यामुळेच त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आल्याचे श्री. शरद कुलकर्णी यांनी सांगितले. यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व त्यांचे स्वीय सहाय्यक श्री. विजय देशमुख यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.
“जमिनीवर पाय ठेवून जगणारे लोकच खऱ्या अर्थाने महान असतात,” हे चोप्रा कुटुंबीयांनी आपल्या आचारातून सिद्ध केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed