शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचा संशय
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील कळंबु गावात शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर तरुणी (वय १५ वर्षे ५ महिने) ही १६ डिसेंबर रोजी सकाळी आपल्या आईसोबत कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. दुपारी आई पाणी भरण्यासाठी जवळच्या दुसऱ्या शेतात गेल्यानंतर तरुणी ही बकऱ्या चारण्यासाठी शेतातच थांबली होती. मात्र, काही वेळानंतर ती शेतात आढळून आली नाही.
कुटुंबीयांनी शेतात व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता घटनास्थळी तिची चप्पल आढळून आली. गावात तसेच परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणावर शोध घेऊनही तरुणीचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.
या घटनेमुळे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अल्पवयीन तरुणीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
