शहरात सलग दुकानफोड्या; चार दुकाने फोडून सुमारे ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास

0
New-Doc-12-19-2025-07.14.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरात अज्ञात चोरट्यांनी दुकानांचे शटर व पत्रे उचकावून चार दुकाने फोडून सुमारे ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १७ रोजी रात्री ते १८ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळोद येथील रहिवासी अब्दुल अजीज मण्यार यांचे अमळनेर शहरातील गुरुनानक शॉपीमध्ये रिगल मोबाईल नावाचे दुकान आहे. १८ रोजी पहाटे मधुकर चौधरी यांचा फोन आल्यावर दुकानाचे शटर व कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानाची पाहणी केली असता पैशांची पेटी गायब असून सुमारे ३० हजार रुपये रोख तसेच मोबाईल व अ‍ॅक्सेसरीज मिळून अंदाजे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे आढळले.

याच रात्री दुर्गा टी डेपो (मालक – सुरेश बठेजा) हे दुकानही फोडण्यात आले असून त्यातून सिगारेटची पाकिटे व सुमारे २ हजार रुपये रोख चोरून नेण्यात आले. तसेच माळीवाडा परिसरातील, जुनी बडोदा बँक जवळील मयूर मोबाईल (मालक – भूषण भाईदास महाजन) येथून ५ हजार ५०० रुपये किमतीचे मोबाईल व मोबाईल साहित्य चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान सना इलेक्ट्रॉनिक्स, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स, पी.जी. टेलर्स आदी दुकाने देखील फोडल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३३४(१), ३२५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह गणेश पाटील, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशीव, उदय बोरसे यांनी भेट देऊन पंचनामे केले. चोरी करणारा संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने एलसीबी पोलिसांनीही तपासात सहभाग घेतला आहे. पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed