अमळनेर सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लुट; ५–६ किलो कट्टी व मापाईच्या नावाखाली आर्थिक फसवणूक..

0
New-Doc-12-18-2025-07.33.jpg

अमळनेर | आबिद शेख

अमळनेर येथील सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) खरेदी केंद्र लामा जिनींग येथे सुरू असून, या केंद्रावर शेतकऱ्यांची उघडपणे आर्थिक लुट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून अमळनेर येथे सीसीआय केंद्र बंद होते. यंदा केंद्राचे उद्घाटन झाले त्या दिवशी शेतकऱ्यांचा कापूस सुरळीतपणे मोजून घेतला गेला. मात्र दुसऱ्या दिवसापासून विविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांच्या कापसावर अन्यायकारक कट्टी लावली जात असल्याचे चित्र आहे.

कापसात कवडी, कचरा किंवा माउचर जास्त असल्याची कारणे सांगत थेट प्रति क्विंटल ५ ते ६ किलोपर्यंत कट्टी केली जात आहे. त्याचबरोबर मापाईच्या नावाखाली प्रति क्विंटल २० रुपये रोख रक्कम घेतली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

अधिक गंभीर बाब म्हणजे ५ ते ६ किलो कट्टी करताना वाहनाचे वजन मोजताना वजनात अडजस्टमेंट केली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे काटापट्टीच्या पावतीत शेतकऱ्यांना कमी झालेले वजन दिसून येत नाही. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठविल्यास केंद्र बंद करण्याची, तसेच तालुका ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी दिली जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

तालुक्यात दुसऱ्या जिनींगमध्ये सीसीआय केंद्र सुरू करण्याबाबत वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात दुसरे केंद्र सुरू केले जात नाही, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

या संपूर्ण प्रकाराकडे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी स्वतः लक्ष घालून चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी व शेतकऱ्यांची होत असलेली लुट तात्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed