अमळनेरच्या दाम्पत्याला संरक्षक भिंतीच्या तंत्रज्ञानाचे पेटंटभारत सरकारकडून सन्मान; नितीन गडकरी यांच्याकडून विशेष कौतुक..

0
New-Doc-12-17-2025-23.21.jpg

आबिद शेख/ अमळनेर

भारत सरकारतर्फे संरक्षण भिंत (रिटेनिंग वॉल) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल बौद्धिक मालमत्ता हक्काचे (पेटंट) प्रमाणपत्र अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील रहिवासी व प्रताप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. विकास पाटील आणि वैशाली पाटील या दाम्पत्याला १० डिसेंबर रोजी प्रदान करण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष कौतुक करत सन्मान केला आहे.

डॉ. पाटील दाम्पत्य हे यापूर्वी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (COEP) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सन २००४ मध्ये केलेल्या त्यांच्या संयुक्त संशोधनातून विकसित झालेल्या ‘ग्रॅव्हीलॉफ्ट टेक्नॉलॉजी’ला भारत सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पुण्यातील चांदणी चौक प्रकल्पात यशस्वीपणे केला आहे.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उंच संरक्षण भिंतींची सुरक्षितता, टिकाऊपणा व शाश्वतता मोठ्या प्रमाणात वाढते. याचबरोबर टाटा हाऊसिंग, पेनिन्सुला ग्रुप, लोढा ग्रुप यांसारख्या नामांकित खाजगी कंपन्यांनीही आपल्या विविध प्रकल्पांमध्ये या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे.

नवीन पेटंट ‘हायब्रिड रिटेनिंग वॉल अ‍ॅण्ड मेथड फॉर कन्स्ट्रक्टिंग इट’ या नावाने नोंदविण्यात आले असून, डॉ. पाटील यांनी आपल्या ३५ वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाच्या आधारे हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या संशोधनाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथून जिओसिस्टीम्स विषयात एम.एस. पूर्ण केले आहे.

या संशोधनामुळे बांधकाम क्षेत्रातील टिकाऊपणा वाढून जनतेची सुरक्षा अधिक मजबूत होणार असून भविष्यातील धोके कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. डॉ. विकास पाटील व वैशाली पाटील यांच्या या यशामुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed