रस्त्यावर सापडलेली बॅग मालकिणीपर्यंत पोहोचवून फोटोग्राफर जयवंत ढवळे यांनी दाखवला प्रामाणिकपणाचा आदर्श..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरात प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. रस्त्यावर सापडलेली बॅग तिच्या मालकिणीचा शोध घेऊन पैशांसह परत करून फोटोग्राफर जयवंत ढवळे यांनी सामाजिक बांधिलकी व प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे.

निकिता स्वप्नील पाटील (रा. नंदुरबार) या छत्तीसगड राज्यात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्या शुक्रवारी त्यांच्या भाऊ निकेत बोरसे यांच्या विवाहासाठी अमळनेर येथे आल्या होत्या. रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास गलवाडे रस्त्यावर दुचाकीच्या डिक्कीतून त्यांची बॅग रस्त्यावर पडली. त्या बॅगमध्ये २४ हजार २७० रुपये रोख, एटीएम कार्ड, लहान मुलीचे स्वेटर व टोपी, बँकेच्या पावत्या तसेच शॉपिंगच्या पावत्या असा महत्त्वाचा ऐवज होता.
ही बॅग फोटोग्राफर जयवंत ढवळे यांना डिझेल भरण्यासाठी जात असताना आढळून आली. बॅगेचा मालक शोधण्याच्या उद्देशाने त्यांनी बॅग उघडून पाहिली. त्यात स्टेट बँकेची पावती मिळाल्यानंतर त्यांनी अमळनेर येथील स्टेट बँकेत चौकशी केली; मात्र खातेदाराचे नाव किंवा पत्ता समजू शकला नाही. आजच्या काळात अनेक जण अशा परिस्थितीत बॅग घरी घेऊन गेले असते, मात्र ढवळे यांनी काहीही करून बॅग मालकिणीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला.
अधिक बारकाईने तपासणी करत असताना त्यांना शॉपिंगच्या पावतीवर एक मोबाईल क्रमांक आढळला. मंगळवारी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता संबंधित महिलाच आपली बॅग हरवल्याची माहिती मिळाली. बॅगेची ओळख पटविल्यानंतर महिलेने आपले आजोबा शांताराम गोविंदराव पाटील, नातेवाईक कैलास मधुकर बोरसे व भाऊ (नवरदेव) निकेश बोरसे यांना ढवळे यांच्याकडे पाठवले.
जयवंत ढवळे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे रोख रक्कमेसह संपूर्ण बॅग नातेवाईकांच्या ताब्यात दिली. या प्रामाणिक कृतीबद्दल महिलेच्या नातेवाईकांनी जयवंत ढवळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून समाजात प्रामाणिकपणाची प्रेरणा देणारी ही घटना ठरत आहे.
