अमळनेर येथे चार तालुक्यांचे होमगार्ड तिमाही संमेलन उत्साहात संपन्न
आबिद शेख/अमळनेर
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, पारोळा व चोपडा या चार तालुक्यांतील होमगार्डचे तिमाही संमेलन अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या संमेलनात होमगार्ड बांधवांच्या विविध समस्या, अडचणी व प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या संमेलनास प्रमुख उपस्थिती म्हणून होमगार्ड विभागाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, प्रशासकीय अधिकारी रामनाथ काळे हे उपस्थित होते. यासह जिल्हा केंद्र नायक गंगाधर महाजन, जिल्हा पलटण नायक मदन रावते, वरिष्ठ लिपिक पंकज नेरकर, कनिष्ठ लिपिक रितेश पाटील, शिपाई हेमंत माळी, अमळनेर प्रभारी समादेशक अधिकारी गोपाल वना पाटील, पारोळा प्रभारी समादेशक अधिकारी अरुण पाटील, चोपड्याचे साजिद सैय्यद शेख, संजीव सोनवणे, धरणगावचे प्रभारी समादेशक अधिकारी ईश्वर महाजन व पलटण नायक ईश्वर पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
होमगार्ड ही मानसेवी संघटना असून पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाची साथ देत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या आदेशानुसार विविध कर्तव्यांवर होमगार्डची तैनाती केली जाते. होमगार्डच्या कामकाजातील अडचणी, समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत मा. महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार चारही तालुक्यांचे संयुक्त तिमाही संमेलन आयोजित करण्यात आले होते.
संमेलनात अमळनेर, पारोळा, चोपडा व धरणगाव येथील सर्व होमगार्ड पथकातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ३६५ दिवस कायमस्वरूपी काम मिळावे, तीन वर्षांची पुनर्नियुक्ती पद्धत बंद करावी, विमा सुविधा, टी.ए., डी.ए. देण्यात यावे, तसेच तालुका समादेशकांची किमान पाच वर्षांसाठी नियुक्ती करावी, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. यासोबतच विशेष कामगिरी बजावलेल्या होमगार्ड बांधवांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी जिल्हा समादेशक अशोक नखाते यांनी उपस्थित होमगार्डच्या सर्व समस्या व तक्रारींची सविस्तर नोंद घेऊन त्या होमगार्ड महासमादेशक, मुंबई यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
संमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल अमळनेर येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी तालुका समादेशक गोपाल वना पाटील यांच्यासह कैलास पाटील, भीमराव संदानशिव व विष्णू पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
