महावितरणच्या फुगवलेल्या बिलांचा भडका; अमळनेरमध्ये १७ सप्टेंबरपासून उपोषणाचा एल्गार!

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर  : नवीन वीज मीटर बसवल्यानंतर अचानक वाढलेल्या वीजबिलांमुळे अमळनेर शहर व परिसरातील ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कमी वीज वापर असतानाही हजारो रुपयांची बिले आकारली जात असल्याचा आरोप करत महावितरणच्या कारभाराविरोधात आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ग्राहकांच्या तक्रारींची तातडीने चौकशी करून अवाजवी बिलांचा प्रश्न मार्गी न लावल्यास १७ सप्टेंबर २०२६ पासून उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयाच्या आवारात तीव्र उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.


हे आंदोलन आमदार शिरीषदादा चौधरी तसेच शिवसेना तालुका प्रमुख व नगरसेवक गुलाब बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रविण पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.
२१ हजारांच्या बिलाने संताप
नवीन मीटर बसवल्यानंतर प्रत्यक्ष वीज वापर आणि बिलामध्ये मोठी तफावत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. विशेषतः अत्यल्प वीज वापर असतानाही हजारो रुपयांची बिले येत असल्याचा आरोप आहे. एका दुकानात केवळ एका पंख्याचा वापर असतानाही तब्बल २१ हजार रुपयांचे बिल आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे महावितरणच्या मीटर रीडिंग आणि बिलिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.


सोलर ग्राहकांच्या बिलिंगमध्येही गोंधळ
सौरऊर्जा प्रकल्प बसवलेल्या ग्राहकांच्या मीटर रीडिंगमध्ये तसेच वीजेच्या आयात-निर्यात (Import-Export) नोंदींमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. सोलर ग्राहकांचे बिलिंग अचूक करून त्यांना अनावश्यक आर्थिक भुर्दंडातून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नवीन मीटरची सक्ती थांबवण्याची मागणी
नागरिकांवर नवीन वीज मीटर बसविण्यासाठी केली जाणारी सक्ती तात्काळ थांबवावी, तसेच जुन्या व नवीन मीटरच्या रीडिंगची पारदर्शक पद्धतीने पडताळणी करून चुकीची बिले दुरुस्त करावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
SDO कार्यालयात निवेदन; चौकशीचे आदेश
या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना तातडीने चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
निवेदन सादर करताना प्रविण पुरुषोत्तम पाटील, पंकज संतोष शेटे, राहुल कंजर, अमन जाकीर खाटिक, मोहित नितीन पाटील, पंकज अरुण चौधरी, जयेश रविंद्र चव्हाण, भूषण गोपिचंद कोळी, गणेश रमेश जाधव, खंडू सोमाजी कोळी, विजय महाजन, जयेश ठाकरे, अथर्व डेरे, किरण बडगुजर, प्रकाश अंधा पाटील, दिनेश ज्ञानेश्वर पाटील आणि राहुल साहेबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महावितरणकडून ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण न झाल्यास १७ सप्टेंबरपासून उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed