मोकाट जनावरे रस्त्यावर सोडणे आता महागात पडणार! अमळनेर नगर परिषद ॲक्शन मोडमध्ये.रस्त्यावर जनावरे सोडाल तर कारवाई; अमळनेर नगर परिषदेचा मालकांना इशारा.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर नगर परिषद हद्दीत रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या पशुमालकांविरोधात आता दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे. गाय, बैल तसेच इतर मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत आहे.
त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पशुमालकांनी आपली जनावरे रस्त्यावर न सोडता सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, यापुढे रस्त्यावर मोकाट जनावरे आढळून आल्यास नगर परिषदेच्या पथकाकडून ती पकडून नियमानुसार गोशाळेत जमा करण्यात येणार आहेत. तसेच संबंधित जनावरांच्या मालकांविरुद्ध लागू नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

जनावरे पकडणे, वाहतूक करणे किंवा गोशाळेत जमा करण्यासाठी होणारा खर्चही संबंधित जनावरांच्या मालकाकडून वसूल करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पशुमालकांनी प्रशासनाच्या सूचनेची गांभीर्याने दखल घेऊन जनावरांची योग्य व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
“जनावरे रस्त्यावर सोडू नका; स्वतःची आणि नागरिकांची सुरक्षितता जपा,” असे आवाहन अमळनेर नगर परिषदेने केले आहे.

