मातीतून साकारला बाप्पा; अमळनेरच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश रोटरी क्लब अमळनेर आणि सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलचा स्तुत्य उपक्रम.
अमळनेर | आबिद शेख

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी रोटरी क्लब अमळनेर आणि सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी शाळेच्या परिसरात शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हाताने आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. बाप्पाची मूर्ती स्वतः तयार करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी तसेच प्रेरणादायी ठरला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच त्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव मिळाला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे विसर्जनानंतर जलप्रदूषणाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ‘मातीची मूर्ती घडवूया, पर्यावरणाचे रक्षण करूया’ हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला.
या उपक्रमासाठी रोटे. महेश पाटील (अध्यक्ष), रोटे. प्रशांत निकम (सचिव), रोटे. सुबोध पाटील (प्रकल्प प्रमुख) आणि रोटे. अजय रोडगे यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच रोटे. किरण कुंभार, रोटे. मनोज पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

