भारतीय रेल्वेचा दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा दिलासा; आता आगाऊ जागा आरक्षणाची सुविधा..
24 प्राईम न्यूज 17 Dec 2025

भारतीय रेल्वेने दिव्यांग प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा व दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. रेल्वे मंत्रालयाने दिव्यांग प्रवाशांना गाड्यांमध्ये आगाऊ जागा बुक करण्याची परवानगी दिली असून, या निर्णयामुळे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
या निर्णयाचा लाभ राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, हमसफर, दुरांतो एक्सप्रेससह सर्व राखीव आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये मिळणार आहे.
रेल्वेच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार,
स्लीपर आणि थर्ड एसी कोचमध्ये एकूण ४ जागा राखीव ठेवण्यात येणार असून, त्यात २ खालच्या आणि २ मधल्या बर्थ असतील.
८ डब्यांच्या गाड्यांमध्ये C1 आणि C7 कोचमध्ये विशेष डिझाइन केलेल्या जागा उपलब्ध असतील. या ठिकाणी दिव्यांग प्रवाशांसोबत एका अटेंडंटसाठी अतिरिक्त जागेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांच्या मदतीसाठी एस्कॉर्ट किंवा अटेंडंटची सुविधा देण्यात येणार आहे.
तसेच, रेल्वेने जारी केलेले वैध ओळखपत्र असलेल्या दिव्यांग प्रवाशांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, प्रवासी आरक्षण काउंटरवर युनिक आयडेंटिटी कार्ड व कन्सेशन सर्टिफिकेटची प्रत सादर करून तिकीट बुक करू शकतात.
या निर्णयामुळे आतापर्यंत रेल्वे भाड्यात सवलत असूनही राखीव जागांच्या कमतरतेमुळे अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सामाजिक समावेशाच्या दिशेने भारतीय रेल्वेचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
