अमळनेरचा पवन शिंपी राष्ट्रीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी तसेच जयहिंद व्यायामशाळेचा कुस्तीपटू पवन प्रताप शिंपी याने आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. धुळे येथील क्रीडा संकुलात ७ डिसेंबर रोजी पार पडलेल्या आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत पवन शिंपीने ७९ किलो वजन गटात दमदार प्रदर्शन केले.

एकूण तीन सामने खेळत पवनने अंतिम फेरीत जामनेरच्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. पवनला त्याचे वडील आणि मार्गदर्शक प्रताप शिंपी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कुस्ती परंपरेला यशाची जोड देत पवनने आपल्या चमकदार कामगिरीने अमळनेरचे नाव उज्ज्वल केले.
पवनच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच खानदेश शिक्षण मंडळाच्या संचालकांनी त्याचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या महिन्यात पवन शिंपी चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत अमळनेरचे प्रतिनिधित्व करणार आहे.
