मांडळ शिवारात महसूल अधिकाऱ्यांवरील हल्ला – गावठी कट्ट्याचा धाक, तीन आरोपी अटक, दोन ट्रॅक्टर जप्त.

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर तालुक्यातील मांडळ शिवारात अवैध वाळू उत्खननावर कारवाई करत असलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर गावठी कट्ट्याच्या धाकाने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. मंडळ अधिकारी पुरुषोत्तम शिवाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री महसूल पथक पांझरा नदीपात्रात गस्त घालत असताना एक जेसीबी (MH 15 BW 9459) व दोन विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी वापरले जात असल्याचे आढळले. महसूल पथकाने चालकांना परवानगीची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत हुज्जत घातली. याचदरम्यान १० ते १२ अनोळखी इसम मोटारसायकलींवर येऊन महसूल अधिकाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यातील एका इसमाने कर्मचारी जितेंद्र दिलीप पाटील यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला तर दुसऱ्याने काठीने मारहाण केली. याचवेळी एका आरोपीने फिर्यादीच्या कपाळावर गावठी कट्टा लावून जिवेठार मारण्याची धमकी दिली व आरोपी जेसीबी, दोन्ही ट्रॅक्टर आणि मोटारसायकलींसह घटनास्थळावरून पसार झाले. फिर्यादीनंतर मारवड पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १९०/२०२५, BNS कलम 132, 118(1), 115, 351(2), 352, शस्त्र अधिनियम 1959 कलम 3, 25 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 48 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ शोधमोहीम राबवली. मारवड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत आरोपी सागर अशोक कोळी, विकास पाटील व किरण कोळी या तिघांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोउपनिरी विनोद पवार करीत आहेत.
