अमळनेरमध्ये दुचाकी चोरीच्या दोन स्वतंत्र घटना – पोलिसांत गुन्हे दाखल
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढू लागल्याचे दोन स्वतंत्र घटनांमधून स्पष्ट झाले आहे. रेल्वे स्टेशन परिसर व सुभाष चौक येथे उभ्या केलेल्या दोन दुचाक्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार अमळनेर पोलिसांत दाखल झाली आहे.

पहिल्या प्रकरणात, राहुल जितेंद्र चौधरी (वय 25, रा. भोईवाडा, अमळनेर) यांनी त्यांची स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच 19 इजे 5439) सुभाष चौकातील महावीर एम्पोरियम दुकानासमोर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता उभी केली होती. संध्याकाळी 6 वाजता ती घेण्यासाठी गेले असता गाडी गायब असल्याचे दिसून आले. परिसरात शोध घेतल्यानंतरही गाडी न मिळाल्याने त्यांनी अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास हेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी बु. येथील महेश यशवंत पाटील यांनी त्यांच्या भावाच्या नावावर असलेली फॅशन प्रो दुचाकी (एमएच 18 एबी 6089) 27 नोव्हेंबर रोजी अमळनेर रेल्वे स्टेशनवर उभी करून शेगाव येथे प्रवास केला होता. दुसऱ्या दिवशी परत आल्यानंतरही गाडी जागेवर न दिसल्याने अज्ञात चोरट्याने गाडी चोरून नेल्याची खात्री पटली. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून तपास हेकॉ विनोद सोनवणे करीत आहेत.
शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
