जुना बस स्टँड येथील फायनल प्लॉट क्रमांक १२३ येथे रस्ता झाला; मात्र साइटपट्ट्या नसल्याने दुकानदारांत नाराजी..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील जुना बस स्टँड परिसरात असलेल्या फायनल प्लॉट क्रमांक १२३ येथे नुकतेच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्याच्या अंदाजपत्रकात साइटपट्ट्या (फुटपाथ/साईड पॅव्हर ब्लॉक्स) समाविष्ट नसल्याने परिसरातील दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यापारी संकुल, लहान-मोठी दुकाने तसेच ग्राहकांची वर्दळ असते. रस्ता झाला असला तरी दोन्ही बाजूंना साइटपट्ट्या नसल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. परिणामी ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचताना अडचणी येत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
दुकानदारांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला चिखल साचतो, तर उन्हाळ्यात धूळ उडते. याचा थेट फटका व्यापारावर बसत आहे. वाहनचालक मनमानी पद्धतीने गाड्या उभ्या करत असल्यामुळे दुकानांसमोर गर्दी, कोंडी व वादाचे प्रकार देखील वाढले आहेत.
या कामाचे नियोजन करताना प्रशासनाने अंदाजपत्रकात साइटपट्ट्यांचा समावेश न केल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. “फक्त काँक्रिटकरण करून विकास पूर्ण होत नाही, सुरक्षितता आणि सोय देखील महत्त्वाची आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक दुकानदारांकडून देण्यात येत आहे.
या प्रकरणी संबंधित नगरपालिकेने तात्काळ लक्ष देऊन स्वतंत्र निधी मंजूर करून साइटपट्ट्यांचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील व्यावसायिक व नागरिकांकडून होत आहे.
