पांझरा नदीपात्रात अवैध वाळू उत्खननावर कारवाईदरम्यान महसुल अधिकाऱ्यांवर हल्ला – गावठी कट्ट्याचा धाक दाखवत आरोपी फरार..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर/मारवड – 7 डिसेंबर 2025
अवैध गौणखनिज (वाळू) उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान रात्रीच्या गस्तीत महसूल अधिकाऱ्यांवर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना मांडळ शिवारातील पांझरा नदीकाठी घडली आहे. या प्रकरणी मंडळ अधिकारी पुरुषोत्तम शिवाजी पाटील यांनी मारवड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
विशेष मोहिमेअंतर्गत रात्री गस्त
प्रांत अधिकारी व तहसिलदार यांच्या आदेशानुसार अवैध उत्खननावरील कारवाईसाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार दिनांक 06 डिसेंबर रोजी रात्री मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पाटील आणि महसूल पथकातील सहा अधिकारी—
संदिप माळी (ग्राम महसूल अधिकारी – मांडळ)
जितेंद्र पाटील (ग्राम महसूल अधिकारी – शिरसाळे बु.) मधुकर पाटील (ग्राम महसूल अधिकारी – जैतपिर)पवनकुमार शिंगारे (ग्राम महसूल अधिकारी – सावखेडा)दीपक पाटील (ग्राम महसूल अधिकारी – डांगर बु.)हे सर्व मोटारसायकलीने वावडे, जवखेडा, अंचलवाडी परिसरात गस्त घालत होते.
जेसीबी व दोन ट्रॅक्टरवर अवैध उत्खनन
पहाटे 1.00 वाजेच्या सुमारास पथक मांडळ शिवारातील पांझरा नदीकाठी पोहोचले, तेव्हा तेथे—
एक पिवळ्या रंगाचे जेसीबी (क्र. MH 15 BW 9459),
एक निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (विनाक्रमांक),
एक हिरव्या रंगाचे ट्रॅक्टर (विनाक्रमांक)
हे उत्खनन करताना दिसले. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये वाळू भरलेली आढळली.
जेव्हा अधिकार्यांनी चालकांची परवानगी विचारून कारवाई सुरू केली, तेव्हा चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
अचानक 5 ते 6 मोटारसायकलींवर 10 ते 12 जणांचे टोळके तेथे धावत आले. त्यांच्या तोंडावर मफलर-रुमाल बांधलेले होते व त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या होत्या.
त्यांनी अधिकार्यांना शिवीगाळ करत धमकी दिल
“ट्रॅक्टर आणि जेसीबी सोडून द्या, नाहीतर जिवंत सोडणार नाही!”
हल्लेखोरांपैकी एकाने महसूल अधिकारी जितेंद्र दिलीप पाटील यांच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला, तर दुसऱ्याने काठीने त्यांच्या पायावर मारहाण केली.
याच दरम्यान एका इसमाने मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या कपाळावर गावठी कट्टा लावून जीवघेणी धमकी दिली—

“आता निघून जा, नाहीतर ठार मारीन; पुन्हा नदीपात्रात दिसलात तर जिवंत सोडणार नाही!”
यामुळे अधिकारी टीमला जीव वाचवून स्थान सोडावे लागले.
मुद्देमाल घेऊन आरोपी फरार
धमकीनंतर जेसीबी चालक, दोन्ही ट्रॅक्टर चालक आणि हल्लेखोर मोटारसायकलस्वार सर्वच जण उत्खननाचा मुद्देमाल घेऊन अंधारात पळून गेले.
घटनेनंतर मंडळ अधिकारी पाटील यांनी प्रांत अधिकारी व तहसिलदारांना माहिती दिली व तातडीने मारवड पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली जेसीबी चालक, दोन्ही ट्रॅक्टर चालक तसेच 10 ते 12 अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.
