जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जि.प. शाळा फापोरे बु. येथे जनजागृती रॅली; समानतेचा संदेश समाजापर्यंत..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर :आंतरराष्ट्रीय जागतिक दिव्यांग दिन जि.प. प्राथमिक केंद्र शाळा, फापोरे बु. येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचा मुख्य हेतू दिव्यांग विद्यार्थ्यांविषयी समतेची भावना निर्माण करणे आणि समाजात समान संधीचे भान निर्माण करणे हा होता.

या कार्यक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पाटील, गटसमन्वयक रविंद्र साळुंखे, तसेच केंद्रप्रमुख राजेंद्र गवते यांचे विशेष सहकार्य लाभले. मुख्याध्यापक सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
विशेष शिक्षक शितल भटा भदाणे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले. शिक्षक ज्ञानेश्वर शिंपी, दिपाली पवार, पुनम पाटील यांनी सक्रिय योगदान दिले. दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लक्षणीय केली.
दिव्यांगता विषयक 21 प्रकार, तसेच दिव्यांग नागरिकांसाठी उपलब्ध शासकीय सुविधा याविषयी माहिती देण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी फलक, घोषवाक्ये आणि प्रबोधनपर संदेशांद्वारे समाजात सकारात्मकता व समतेचा संदेश पोहोचवला.
दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून माजी 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व दिव्यांग विद्यार्थी व पालकांचे फुलपुष्पांनी स्वागत करून मुलांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांच्या गुणविकासासाठी नृत्य, चित्रकला, कोलाज आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून आपले कलागुण सादर केले संपूर्ण कार्यक्रमात ‘समानता, संवेदनशीलता आणि सर्वसमावेशकता’ या मूल्यांचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला.
